कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : केंद्र शासनाने सोयाबीन तेलावरील कृषिकर 20 टक्क्यांवरून पाच टक्के आणि क्रूड पाम ऑईलवर कृषिकर 20 टक्क्यांवरून साडेसात टक्के केल्याने कोल्हापूर जिल्ह्यात आज, गुरुवारपासून खाद्यतेल सरासरी प्रतिकिलो सहा ते आठ रुपये स्वस्त झाले आहे.
सोमवारी वायदे बाजार सुरू झाल्यानंतर दर आणखी स्थिर होतील. आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी आणि डॉलरचे वाढलेले दर यामुळे खाद्यतेल अजून सरासरी चार ते पाच रुपयांनी स्वस्त होईल, असे तज्ज्ञांनी सांगितले.
मागील वर्षी दिवाळीत सरकी तेल प्रतिकिलो 90 ते 96 रुपये, सूर्यफूल तेल 108 ते 110 रुपये किलो तर शेंगदाणा तेल 118 ते 120 रुपये किलो होते. मागील दोन दिवसांपर्यंत हेच तेलाचे दर सरकी 186 रुपये किलो, सूर्यफूल तेल 186 तर शेंगदाणा तेल 188 रुपये किलो असा दर होता.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर खाद्यतेलाचे दर अवलंबून आहेत. रुपयाच्या तुलनेत डॉलरची किंमत विक्रमी वाढली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाची मागणी वाढल्याने अॅग्रीसेसचा तत्काळ परिणाम दिसून येत असला तरी सोयातेल 20 टक्क्यांऐवजी 10 टक्के तर पाम ऑईल सुमारे 12 टक्के इतके खाली येईल. कमी केलेल्या सेसच्या 50 टक्के इतकाच दरात फरक जाणवेल. सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल आदी नवीन पीक बाजारात आल्यानंतरच तेलाच्या किमती अजून खाली येऊ शकतील. दरम्यान, सोमवारी वायदेबाजार सुरू झाल्यानंतर खाद्यतेल चार ते पाच रुपये कमी होण्याची शक्यता आहे. खाद्यतेलाच्या किमतीवर यापेक्षा जास्तीचा फरक तूर्त पडणार नसल्याचे मत तेल व्यापारी हितेश कापडिया यांनी स्पष्ट केले.
तेलाच्या दरात सर्वसाधारणपणे दुप्पट वाढ झाल्याने ग्राहकांची खरेदी क्षमताही मंदावली आहे. यापूर्वी 15 लिटरचा डबा नेणारे ग्राहक दोन ते पाच किलो असे गरजेप्रमाणे खरेदी करत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात दसरा आणि दिवाळीमुळे किमान 500 टन खाद्यतेल व्यापार्यांकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे. मंदावलेली मागणी आणि जुना शिल्लक स्टॉक याचाही दरावर परिणाम होणार आहे.
सरकी 160
सूर्यफूल 180
शेंगदाणा 182
सरकी 186
सूर्यफूल 186
शेंगदाणा 188
केंद्र शासनाने कृषिकर कमी केल्याचा तत्काळ परिणाम गुरुवारी बाजारात दिसून आला. कोल्हापुरात सरकी तेल 160 रु. किलो, सूर्यफूल तेल 180 रुपये तर शेंगदाणा तेल 182 रुपये किलो झाले आहे.
– केतन तवटे
तेलाचे होलसेल व्यापारी