दसरा सणाने नवरात्रौत्सवाची आज सांगता; सोहळ्यासाठी दसरा चौक सज्ज | पुढारी

दसरा सणाने नवरात्रौत्सवाची आज सांगता; सोहळ्यासाठी दसरा चौक सज्ज

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

पारंपरिक दसरा सणाने शुक्रवारी (दि.15) नवरात्रौत्सवाची सांगता होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्टच्या वतीने दसरा चौकात निमंत्रित लोकांच्या उपस्थितीत दसरा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सूर्यास्तावेळी सायंकाळी 6 वाजून 9 मिनिटांनी, शमीपूजन होईल. यावेळी शाहू महाराज, खा. संभाजीराजे, मालोजीराजे, शहाजीराजे, यशराजराजे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

नवरात्रौत्सवातील मुख्य सोहळा असणारा करवीर संस्थानचा शाही दसरा गतवर्षी कोरोनामुळे रद्द करून तो जुना राजवाडा येथे बंदिस्त स्वरूपात घेतला होता. यामुळे यंदाच्या दसरा महोत्सवाकडे सर्वांचे लक्ष लागून होते. कोरोनाचा कहर कमी झाल्याने छत्रपती देवस्थान ट्रस्टने हा सोहळा परंपरेप्रमाणे दसरा चौकातच घेण्याचा निर्णय घेतला. हा सोहळा निमंत्रित लोकांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी करवीर छत्रपतींचे सरदार-मानकरी, जहाँगीरदार यांच्यासह राजकीय नेते, लोकप्रतिनिधी, शासकीय पदाधिकारी, विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी, करवीर निवासिनी अंबाबाई, तुळजाभवानी व गुरू महाराज यांच्या पालख्या मोजक्या मानकर्‍यांसह वाहनातून पंचगंगा नदीघाट, संस्थान शिवसागर व सिद्धार्थनगर येथे नेण्यात येणार आहेत.

दरम्यान, कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर दसरा सोहळ्यास लोकांनी गर्दी करू नये, सोशल मीडियाच्या माध्यमातून घरबसल्या दसरा सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

ऐतिहासिक दसरा सोहळ्यासाठी दसरा चौक सज्ज

शुक्रवारी निमंत्रणासाठी साजर्‍या होणार्‍या पारंपरिक दसरा सोहळ्यासाठी ऐतिहासिक दसरा चौक सज्ज झाला आहे. गतवर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हा सोहळा रद्द झाला होता. यावर्षी तो मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. रात्री उशिरापर्यंत त्याची तयारी सुरू होती. गेल्या दोन दिवसांपासून मैदानाचे सपाटीकरण आणि स्वच्छतेचे काम सुरू होते. गुरुवारी दुपारी ते पूर्ण झाले. मैदाना भोवताली असलेल्या सर्व टपर्‍या हलविण्यात आल्या आहेत. परिसरात औषध फवारणीही करण्यात आली आहे. मैदानाच्या मध्यभागी करवीर संस्थानचा भगवा ध्वज लावण्यात आला आहे. लक्कडकोट उभारण्याचे काम सायंकाळपर्यंत सुरू होते. करवीर निवासिनी श्री अंबाबाई, श्री तुळजाभवानी आणि गुरू महाराज यांच्या पालख्या ठेवण्यासाठी तसेच मान्यवरांच्या बैठकीसाठी

शामियाना उभारण्यात आला आहे. दसरा चौकाच्या कमानीची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. मैदानाच्या सभोवताली विद्युत व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे दसर्‍याच्या पूर्वसंध्येला दसरा चौक विजेच्या झगमगाटात उजळून गेला होता.

दसरा महोत्सव समिती, छत्रपती देवस्थान चंँरीटेबल ट्रस्ट, जिल्हा, पोलीस व महापालिका प्रशासनाच्या वतीने या सोहळ्याची तयारी करण्यात येत आहे. समितीचे पदाधिकारी तसेच अधिकार्‍यांकडून दिवसभर पाहणी करण्यात येत होती.

तोफेच्या सलामीने जोतिबा डोंगरावरील नवरात्र उत्सवाची सांगता

जोतिबा डोंगर : पुढारी वृत्तसेवा
तोफेच्या सलामीने जोतिबा डोंगरावरील नवरात्र उत्सवाची गुरुवारी सांगता झाली. दख्खनच्या राजाचा सकाळी पहिला पालखी सोहळा देखील संपन्न झाला. गुरुवारी पहाटे तीन वाजता मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. देवांची पाद्यपूजा व काकड आरती सोहळा पार पडला. यानंतर पहाटे पाच ते सहा या वेळेत अभिषेक घालण्यात आला. यानंतर श्री जोतिबा देवाची श्रीकृष्ण रूपातील आकर्षक महापूजा बांधण्यात आली. सकाळी श्रींचा पहिला पालखी सोहळा मंदिरात निघाला. यावेळी धुपारती सोहळा, मंदिरातील धार्मिक विधी पार पाडून उंट, घोडे, पुजारी, मानकर्‍यांसह लवाजमा यमाई मंदिराकडे निघाला. यमाईदेवी मंदिरात धार्मिक विधी पार पाडून श्री तुकाईदेवी मंदिराकडे धार्मिक विधीसाठी प्रस्थान झाला व नंतर जोतिबा मंदिरात आला ,नवरात्र उत्सवाची सांगता करून तोफेचो सलामी दिली. हतकलंगले लोकसभा मतदार संघाचे खासदार धैर्यशील माने यांनी सपत्नीक दख्खनच्या राजाचे दर्शन घेतले . मंदिरात पालखी सोहळ्यासाठी उत्कर्ष समितीने पोलीस बँड ची मागणी जिल्हा पोलिस प्रमुख शैलेश बलकवडे यांच्याकडे केली होती.जोतिबाच्या पहिल्या पालखीला पोलीस बॅण्डची देखील शासकीय सलामी होती.

कर्नाटक राज्याच्या मंत्री जोल्ले यांनी घेतले जोतिबा दर्शन

कर्नाटक राज्याच्या धर्मादाय व वक्फ मंत्री नामदार शशिकला जोल्ले यांनी त्यांचे पती चिकोडी लोकसभा मतदार संघाचे खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्यासाहित दर्शन घेतले .यावेळी महाराष्ट्र राज्य शासनाने इ पास रद्द करावा भाविकांची या मुळे गैरसोय होत आहे असे या वेळो प्रतिपादन दिलें

Back to top button