

कुडित्रे; प्रा. एम. टी. शेलार : 2016-17 च्या हंगामापासून भारतातून कच्च्या साखरेची (Raw Sugar ) निर्यात वाढत आहे. भारतीय कच्च्या साखरेत ब्राझिलपेक्षाही कमी बॅक्टेरिया काऊंट, अधिक पोलरायझेशन यामुळे परदेशात या साखरेची मागणी वाढत आहे. त्यामुळे कच्च्या साखरेच्या उत्पादनास चालना द्यावी, असे मत साखर कारखानदारांतून व्यक्त केले जात आहे.
केंद्र सरकारने 2022-23 या व्यापार वर्षामध्ये 60 लाख टन साखर निर्यात करण्याची परवानगी दिली होती. त्यानुसार 15 मार्च 2023 अखेर 50.04 लाख टन अशी एकूण 37 हजार 398 कोटी रुपयांची (उद्दिष्टाच्या 83 टक्के) साखर निर्यात केली आहे.
साखर निर्यातीचा आलेख वाढता आहे. 2016-17 च्या हंगामात केवळ पांढर्या साखरेची 10.46 लाख दहा लाख टन निर्यात झाली.2017-18 च्या हंगामात कच्ची साखर (रॉ शुगर) 47 हजार, तर पांढरी साखर (व्हाईट शुगर) 5.73 लाख अशी एकूण 6.2 लाख टन साखर निर्यात झाली. त्यातून 5225.6 कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले.2018-19 मध्ये कच्ची साखर (रॉ शुगर) 13.13 लाख, तर पांढरी साखर (व्हाईट शुगर) 24.87 लाख अशी एकूण 38 लाख टन साखर निर्यात झाली. त्यातून 9523.14 कोटींचे परकीय चलन मिळाले. 2019-20 मध्ये कच्ची साखर (रॉ शुगर) 17.87 लाख, तर पांढरी साखर (व्हाईट शुगर) 41.56 लाख अशी एकूण 59.54 लाख टन साखर निर्यात झाली. त्यातून 13,981.56 कोटींचे परकीय चलन मिळाले. 2020-21 मध्ये कच्ची साखर (रॉ शुगर) 28.16 लाख, तर पांढरी साखर (व्हाईट शुगर) 43.74 लाख अशी एकूण 71.9 लाख टन साखर निर्यात झाली. त्यातून 20,668.57 कोटींचे परकीय चलन मिळाले.
2021-22 मध्ये कच्ची साखर (रॉ शुगर) 56.29 लाख, तर पांढरी साखर (व्हाईट शुगर) 53.71 लाख अशी एकूण 110 लाख टन इतकी विक्रमी निर्यात झाली. त्यातून 26,545.78 कोटींचे परकीय चलन मिळाले. 2022-23 मध्ये पहिल्या पाच महिन्यांत कच्ची साखर (रॉ शुगर) 19.13 लाख, तर पांढरी साखर 30.91 लाख अशी एकूण 50.04 लाख टन इतकी निर्यात झाली. त्यातून 37,397.86 कोटींचे परकीय चलन मिळाले.