पंतप्रधानांच्या सूचनेनुसार शिवसेनेला मुख्यमंत्रिपद; बदलाचा प्रश्न येतो कुठे? : दीपक केसरकर | पुढारी

पंतप्रधानांच्या सूचनेनुसार शिवसेनेला मुख्यमंत्रिपद; बदलाचा प्रश्न येतो कुठे? : दीपक केसरकर

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री पद हा शिवसेनेचा हक्क आहे, त्यांना ते देणार असेल असे सांगितले असेल तर ते द्या, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भावा-भावाप्रमाणे काम करत आहेत. त्यात इतरांच्या पोटात दुखण्याचे काहीच कारण नाही, असे सांगत मुख्यमंत्री बदलाचा प्रश्न येतो कुठे, असा सवाल शिवसेनेचे प्रवक्ते व शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी बोलताना केला. बारसू येथे प्रकल्पाची जागा उद्धव ठाकरे यांनीच सुचवली होती, आता कोकणाच्या विकासात आड का येता, असा सवालही त्यांनी केला.

उद्धव ठाकरे बारसूला जाणार आहेत. याबाबत केसरकर म्हणाले, विविध विधाने करून उद्धव ठाकरे स्वत:ची किंमत कमी करत आहेत. हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाऊ नये, म्हणून त्यांनीच पंतप्रधानांना पत्र दिले होते, आता का राजकारण करता? राज्यात 10-12 हजार नोकर्‍या देणारे प्रकल्प बाहेर गेले, असे आदित्य ठाकरे खोेटेच सांगत बसलेत, बारसूच्या प्रकल्पाने पहिल्या टप्प्यात एक लाख तर दुसर्‍या टप्प्यात एक लाख नोकर्‍या निर्माण होणार आहे. हा प्रकल्प कोकणाचा कायापालट करणारा ठरणार आहे. शिंदे-फडणवीस नसते तर समृध्दी महामार्ग झाला नसता, मुंबईची मेट्रो झाली नसती. कशाला विरोध करायचा हे बाळासाहेबांकडून शिकले पाहिजे; अन्यथा आहे ते शिवसैनिकही सोडून जातील, असेही केसरकर म्हणाले.

बदल्याची, खंजीर खूपसण्याची भाषा उद्धव ठाकरे यांना शोभत नाही, स्वत: काँग्रेस-राष्ट्रवादीचे जोडे पुसले म्हणून हा उठाव केला. तुम्ही घरात आणि कॅबिनेट दुसरेच चालवत होते. शिवसेना वाढवणे हे तुमचे कर्तव्य होते; पण ते तुम्ही केले नाही, असे सांगत बारसूप्रकरणी नागरिकांशी चर्चा करण्यास सरकार तयार आहे. हा प्रकल्प पर्यावरणद़ृष्ट्या सुरक्षित आहे, त्यातून काहीच नुकसान होणार नाही. ज्यांना कमी दर मिळेल, असे वाटते, त्यांना जादा दर दिला जाईल. चर्चा करून प्रश्न सोडवले जातील, असेही केसरकर यांनी सांगितले. यावेळी जिल्हा प्रमुख रवींद्र माने उपस्थित होते.

येणार्‍यांचे स्वागतच !

शरद पवार यांच्या पाठिंब्याशिवाय अजित पवार काहीही करू शकत नाहीत, असे सांगत केसरकर म्हणाले, जे जे जुने बंध सोडून, मोदी, शिंदे-फडणवीस यांचे नेतृत्व मान्य करून येणार असतील तर त्यांचे स्वागत आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या बदल्यांसाठी अर्थपूर्ण व्यवहार होत असल्याच्या आरोपाबाबत बोलताना असे घडणार नाही, तसे असेल तर तक्रार करा. कारवाई केली जाईल, असेही केसरकर यांनी सांगितले.

Back to top button