कोल्हापूर बाजार समिती मतदारांसाठीचा ‘तो’ आदेश प्राधिकरणाकडून रद्द | पुढारी

कोल्हापूर बाजार समिती मतदारांसाठीचा ‘तो’ आदेश प्राधिकरणाकडून रद्द

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  बाजार समितींच्या मतदारांबाबत बुधवारी सहकारी निवडणूक प्राधिकरणाने काढलेला आदेश रद्द केला. नव्या आदेशात विकास सेवा संस्था आणि ग्रामपंचायत या दोन्ही मतदारसंघांत ज्यांची नावे आहेत, त्यांना आता दोन्ही मतदारसंघातून मतदान करण्याचे अधिकार मिळाले आहेत.

मात्र, अडते-व्यापारी मतदारसंघात एका मतदाराचे मतदार यादीमध्ये एकापेक्षा जास्त नावे असतील, तर त्या मतदाराला एकदाच मतदान करता येणार आहे. या निर्णयामुळे कोल्हापूर बाजार समितीच्या 210 अडते-व्यापारी मतदानापासून वंचित राहणार आहेत. बुधवारी प्राधिकरणाने या मतदारांबाबत आदेश काढले होते. निवडणुकीच्या पूर्वसंध्येला हा आदेश निघाल्याने बाजार समितींच्या मतदारांमध्ये मोठी खळबळ उडाली होती. या निर्णयामुळे मतदान संख्या कमी होऊ शकली असती. यासंदर्भात आ. पी. एन. पाटील यांच्यासह काहीनी प्राधिकरणाकडे तक्रारी दाखल केल्या. यावर प्राधिकरणाने निर्णय घेत तो आदेश मागे घेतला आहे. नवीन आदेशानुसार एकच मतदार ग्रामपंचायत सदस्य आणि विकास संस्थेचा संचालक असेल, तर तो दोन्ही ठिकाणी मतदान करेल; मात्र विकास संस्थेचा संचालक दोन किंवा दोनपेक्षा जास्त विकास संस्थेत संचालक असेल आणि त्याचे नाव मतदार यादीत आले असेल, तर त्याला एकदाच मतदान करता येणार आहे.

आ. पी. एन. पाटील म्हणाले, बाजार समितीच्या मतदारांबाबत सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जो आदेश काढला होता, तो आदेश विकास सेवा संस्था आणि ग्रामपंचायत या दोन्ही मतदारसंघांतील मतदार यादीमध्ये एकाच व्यक्तीचे नाव असलेल्या मतदारांचा हक्क हिरावून घेणारा होता. आता तो निर्णय रद्द केल्याने दोन मतदारसंघांत मतदानाचे हक्क बजावता येणार आहेत.

जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार

प्राधिकरणाच्या आदेशाविरोधात वैभव सावर्डेकर व कुमार आहुजा यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार दाखल केली आहे. हा निर्णय अनेक मतदारांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवणारा आहे. हा निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.

Back to top button