राजाराम साखर कारखाना : निष्ठा फाट्यावर… मतदान नोटांच्या गठ्ठ्यांवर | पुढारी

राजाराम साखर कारखाना : निष्ठा फाट्यावर... मतदान नोटांच्या गठ्ठ्यांवर

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत नेत्यांवरील रोषही काही सभासदांनी चिठ्ठ्यांद्वारे व्यक्त केला आहे. यामध्ये दलबदलू कार्यकर्त्यांवर टीका टिपणी करण्याबरोबरच नेत्यांना सल्ला देण्याचेही काम सभासदांनी मतपेटीतून केले आहे.

कोणी 10, कोणी 5, किती वाटले मोजदाद नाही, महाडिकसाहेब, बंटी साहेब टोकाच्या ईर्ष्येपायी कसला नि कुठला पायंडा पडतोय, यापुढे तरी विचार करा. सभासदांकडून मताचे मोल घेताना होत आहेत गुदगुल्या, निवडणुकीनंतर कामासाठी नेत्यांपुढे जाताना काढाव्या लागतील नाकदुर्‍या अशी चिठ्ठी सभासदांनी टाकली आहे.

बंटीसाहेब ओळखा…

बंटी पाटील साहेब कसबा तारळेतील तुमचा उदयोन्मुख पाटील नावाचा कार्यकर्ता गावात राजकारण करतोय तेव्हा आमचं मत कोणाला असेल ते ओळखून घ्या.

सर, तुमचा पण विश्वास घात करेल

बंटी पाटील साहेब तुम्ही सर्जेराव माने (सरांचं) ऐकून टीका करू नका. हा माणूस तुमचा पण एक दिवस विश्वासघात करेल. कारखाना आणखी व्यवस्थित कसा चालेल याकडे लक्ष द्या. तुम्ही जर कारखान्याला सहकार्य केले, तर कारखाना आणखी चांगला चालेल. माने सर, जरा निष्ठा जपा. खालेल्या घराचे वासे मोजू नका, 28 वर्षे सत्ता भोगून पैशासाठी सरड्याप्रमाणे वागणे बदला. नाही तर जनता तुम्हाला माफ करणार नाही, अशा चिठ्ठ्याही मिळाल्या.
सतेज पाटील यांच्याबरोबरच अमल महाडिक यांनाही सभासदांनी चिठ्ठ्यांद्वारे सूचना केल्या आहेत. शिरोलीतील एका व्यक्तीपासून जरा लांब राहा; अन्यथा शिरोलीतील सामाजिक व सहकारामधील राजकारणाला भविष्य काळात वेगळे वळण लागेल, असे मत एका सभासदाने चिठ्ठीतून व्यक्त केले आहे.

लग्नं ठरेनात, कामगारांना कायम करा

महाडिक साहेब, कारखाना अगदी व्यवस्थित चालवला आहात; पण कर्मचारी कायम नसल्याने त्यांची लग्नं होत नाहीत. काही सेवानिवृत्तीला आले आहेत. तेव्हा कामगारांच्या नेमणुका तेवढ्या लवकर करा, अशी अपेक्षा व्यक्त करणारी चिठ्ठीही मतपेटीत आढळली.

पैसा कोठून वसूल करणार

या निवडणुकीत झालेला खर्च कोठून वसूल करणार हे समजत नाही. सत्तेत आल्यानंतर इथेनॉल, को-जनरेशन असे विभाग सुरू करून गाळप क्षमता 5 ते 7 हजार करावी म्हणजे सभासदांना चांगला दर देता येईल. बाकी तुम्हा दोघांचे आरोप- प्रत्यारोप आम्हास मान्य नाहीत, असे एका सभासदाने चिठ्ठीतून मत व्यक्त केले आहे.

Back to top button