महाडिक समर्थकांचा जल्लोष | पुढारी

महाडिक समर्थकांचा जल्लोष

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक निकालानंतर महाडिक समर्थकांनी माजी आ. महादेवराव महाडिक आणि अमल महाडिक यांच्या शाहूपुरी येथील कार्यालयासह ताराराणी चौकातील पेट्रोल पंपावर गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला.

महाडिक यांच्या शाहूपुरी येथील कार्यालयासमोर सकाळी तुरकळ कार्यकर्ते होते. दुपारनंतर येथे कार्यकर्त्यांची वर्दळ वाढली. याबरोबरच ताराराणी चौकातील पेट्रोल पंपावरही कार्यकर्त्यांनी दुपारनंतर मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. या दोन्ही ठिकाणी सायंकाळनंतर गुलालाची उधळण सुरू झाली. कार्यकर्त्यांनी एकमेकांना गुलाल माखत आनंद व्यक्त केला. काही कार्यकर्त्यांनी दुचाकीच्या सायलेन्सरच्या पुंगळ्या काढून घिरट्या घातल्या. फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण आणि कार्यकर्त्यांचा जल्लोष अशा उत्साही वातावरणामुळे कार्यकर्त्यांच्या आनंदास पारावार राहिला नाही. पेट्रोल पंपावर जल्लोष करून काही कार्यकर्त्यांनी महाडिक यांच्या शिरोली येथील निवासस्थानाकडे मोर्चा वळविला. यामुळे ताराराणी चौक ते सांगली फाटा या मार्गावर गुलालाने माखलेल्या कार्यकर्त्यांची वर्दळ दिसून आली. रात्री आठ ते नऊ वाजेपर्यंत कार्यकर्ते जल्लोष साजरा करत होते.

Back to top button