कोल्हापूर : मोकाट कुत्र्यांची दहशत! | पुढारी

कोल्हापूर : मोकाट कुत्र्यांची दहशत!

कोल्हापूर, दिलीप भिसे : रात्री अकरानंतर शहर, उपनगर, ग्रामीण भागात मध्यवर्ती रस्त्यावर टोळक्यांची गर्दी होते. काळोखाच्या साम्राज्यात त्यांची झुंडशाही असते. लोकांची घरांकडे परतण्याची घाई… रस्त्यावरील खड्डे, स्पीड ब्रेकरचे धक्के खात चुकवित गडी जाताना अचानक दोन्ही बाजूंनी त्यांच्याकडून पाठलाग सुरू होतो. अक्षरश: जीवघेणा थरारक पाठलाग… मोकाट कुत्र्यांची शहरातच नव्हे उपनगरांसह ग्रामीण भागातही दहशत आहे.

निर्जन परिसर सोडा, अगदी शहरातील मध्यवर्ती चौक, प्रमुख मार्गावरून जरी दुचाकीस्वार निघाला, तरी अंधारात दडलेल्या मोकाट कुत्र्यांच्या टोळक्यांकडून एक-दीड किलोमीटर अंतर पाठलाग केला जातो.

डोळ्यादेखत अर्भकाचे तोडले लचके!

छत्रपती प्रमिलाराजे शासकीय (सीपीआर) रुग्णालय परिसरात गुरुवारी सकाळी मोकाट कुत्र्यांच्या टोळक्याने मृतावस्थेतील दोन अर्भकांचे लचके तोडले. कचरा कोंडाळ्यात प्लास्टिक पिशवीत गुंडाळून टाकलेले अर्भक कुत्र्यांनी रुग्णालय परिसरात फरफटत आणून, उपस्थितांच्या डोळ्यादेखत मांसाचा गोळा गिळंकृत केला.

शहरात कमालीची दहशत

शहरातील महाद्वार रोड, मटण मार्केट, भाऊसिंगजी रोड, सीपीआर चौक, स्टेशन रोड, ताराराणी चौक, तावडे हॉटेल परिसर, दसरा चौक, मिरजकर तिकटी, बिनखांबी मंदिर, संभाजीनगर, हॉकी स्टेडियम, टेंबलाईवाडी, विक्रमनगर, आयटीआय-पाचगाव रोड, जरगनगर रोड, पाचगाव रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वागत कमान, आर. के. नगर, शांतिनिकेतन परिसर, शेंडा पार्क, सुभाषनगर, राजेंद्रनगरसह शिंगणापूर, रंकाळा टॉवर, फुलेवाडी परिसरात मोकाट कुत्र्यांचे साम—ाज्य असते.

चिमुरड्यांसह दोन महिला सुदैवाने बचावल्या

आठवड्यापूर्वी गांधीनगर परिसरात कुत्र्यांच्या टोळक्याने मोपेडस्वार महिलांचा पाठलाग केला. सहा ते सात कुत्र्यांचे टोळके त्यांच्यामागे धावत लागले होते. जिवाच्या आकांताने महिलेने मोपेडचा वेग वाढविला. नियंत्रण सुटल्याने मोपेड रस्त्यावर पार्किंग केलेल्या मोटारीवर आदळली. लहान मुलीसह दोन महिला दहा ते बारा फूट उंचीवरून जमिनीवर कोसळल्या. केवळ दैव बलवत्तर म्हणूनच त्यांचा जीव वाचला.

पाचजणांचा मृत्यू, तरीही गांभीर्य नाही?

शहरात मोकाट कुत्र्यांची दहशत वाढली असतानाही महापालिका प्रशासनासह आरोग्य विभागाच्या यंत्रणेने झोपेचे सोंग घेतले आहे की काय, अशी शंका आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यात गेल्या वर्षभरात दोन लहान मुलांसह पाचजणांचा मृत्यू झालेला असतानाही त्याचे प्रशासनाला गांभीर्य नाही.

Back to top button