सीपीआरच्या आवारात दोन मृत अर्भकांचे कुत्र्यांनी लचके तोडले

कोल्हापूर : सीपीआर रुग्णालयाच्या आवारात कुत्र्यांनी दोन अर्भकांचे लचके तोडलेल्या शवविच्छेदन कक्षाजवळील घटनास्थळाची वैद्यकीय अधिकार्‍यांसह पोलिस अधिकार्‍यांनी पाहणी केली
कोल्हापूर : सीपीआर रुग्णालयाच्या आवारात कुत्र्यांनी दोन अर्भकांचे लचके तोडलेल्या शवविच्छेदन कक्षाजवळील घटनास्थळाची वैद्यकीय अधिकार्‍यांसह पोलिस अधिकार्‍यांनी पाहणी केली
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती प्रमिलाराजे (सीपीआर) सर्वोपचार रुग्णालयाच्या आवारात गुरुवारी सकाळी अंगावर शहारे आणणारी आणि माणुसकीला काळीमा फासणारी हृदयद्रावक घटना घडली. प्लास्टिकच्या पिशवीतून कचरा कोंडाळ्यात टाकलेल्या चार आणि सहा महिन्यांच्या दोन मृत अर्भकांना फरफटत आणून मोकाट कुत्र्यांनी त्याचे अक्षरशः लचके तोडले. मन सुन्न करणार्‍या घटनेने खळबळ उडाली आहे. पोलिसांसह या प्रकरणी वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनानेही तातडीने चौकशी सुरू केली आहे.

एक मृत अर्भक चार आणि दुसरे सहा महिन्याचे असल्याने संबंधित गर्भवतींचा बेकायदा गर्भपात कोणी व कुठे केला, याचा शोध घेतला जात आहे. या घटनेचा लवकरच पर्दाफाश करू, असे वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले.

तपासाधिकार्‍यांचा संशयकल्लोळ

सीपीआर रुग्णालयाच्या पिछाडीस संरक्षक भिंतीलगत कचरा कोंडाळा आहे. कोंडाळ्यापासून शंभर ते सव्वाशे फूट अंतरावर असलेल्या शवविच्छेदन कक्षालगत शेडजवळ प्लास्टिक पिशवीत गुंडाळलेली ही दोन मृत अर्भके आढळून आली.

शवविच्छेदन कक्षातील कर्मचारी योगेश येरुडकर हा कक्षाबाहेर आला असता त्याच्या निदर्शनास हा प्रकार आला. थोडे पुढे जाऊन पाहताच कुत्री लचके तोडत असलेली अर्भके पाहून त्याच्याही अंगावर शहारे आले. त्याने कुत्र्यांना हटकण्याचा प्रयत्न केला. पण कुत्री मागे हटली नाहीत. त्यातील तीन कुत्री तर येरुडकर याच्या अंगावर धावून गेली. यामुळे त्याची पळता भुई थोडी झाली.

येरुडकर याने तातडीने ही माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला दिली. अवघ्या सहा ते सात मिनिटांत करवीर पोलिस ठाण्याचे हावलदार गणपतराव पवार, श्रीकांत पाटील व सायली पाटील घटनास्थळी आले. त्या पाठोपाठच लक्ष्मीपुरीचे पोलिस निरीक्षक इकबाल महात, हावलदार संजय कोळी हे दाखल झाले. पवार यांनी कुत्र्यांना लाठीच्या सहाय्याने हुसकावून लावले.

ही माहिती मिळताच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ. गिरीश कांबळे व डॉ. किरण कांबळेही घटनास्थळी आले. त्यांनी या प्रकरणी तातडीने चौकशी सुरू केली. सीपीआरमधीलच प्रसूतिगृह आणि बाल शिशू संगोपन केेंद्रात जाऊन दोन दिवसांत प्रसृतीसाठी आलेल्या महिला, त्यांची सद्य:स्थिती, गर्भवती काळात अर्भक मृत झालेल्या महिलांचीही त्यांनी माहिती घेतली. दरम्यान, वरिष्ठ अधिकार्‍यांनीही घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या घटनेची माहिती मिळताच शहरासह जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्था व संघटनांच्या कार्यकर्त्यांनीही सीपीआरकडे धाव घेतली. अंगावर शहारे आणणार्‍या या घटनेबाबत प्रशासनावर त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

सीसीटीव्ही फुटेजद्वारे चौकशी सुरू

या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी सीपीआरसह परिसरातील प्रसूतिगृह, बाल शिशू संगोपन केंद्र तसेच सीपीआर आवारातील सीसीटीव्ही फुटेजद्वारे तपास सुरू केला आहे. या फुटेजची प्रशासनाकडे मागणी केली आहे. त्याद्वारे या प्रकाराचा भांडाफोड होईल, असा विश्वास तपास अधिकारी महात यांनी व्यक्त केला.

सखोल चौकशी करा

या प्रकरणाची दखल घेत पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. देसाई यांनी दुपारी घटनास्थळाची पाहणी करून हा प्रकार बेकायदेशीर गर्भपाताचा असावा का यादृष्टीनेही तपास करण्याच्या सूचना दिल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news