आम्ही सहकार टिकवणार्‍या महाडिक यांच्या बाजूचे : राहुल आवाडे

आम्ही सहकार टिकवणार्‍या महाडिक यांच्या बाजूचे : राहुल आवाडे
Published on
Updated on

कोल्हापूर : आम्ही सहकार टिकवणार्‍या लोकांपैकी आहोत. त्यामुळे राजाराम कारखाना सहकारी राहायचा असेल, तर तो महादेवराव महाडिक यांच्या पंखाखालीच राहिला पाहिजे. ज्यांनी स्वतःचा सहकारी कारखाना खासगी केला त्यांनी 'राजाराम'वर नजर ठेवू नये, असा टोला जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल आवाडे यांनी लगावला.

राजाराम साखर कारखाना निवडणुकीत सत्तारूढ सहकार आघाडीने जोरदार मुसंडी मारली आहे. हातकणंगले तालुक्यातील रुई गावामध्ये छत्रपती राजर्षी शाहू सहकार आघाडीची प्रचार सभा झाली. यावेळी आवाडे बोलत होते. या सभेला खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती.

राहुल आवाडे यांनी सत्तारूढ छत्रपती राजर्षी शाहू सहकार आघाडीला पाठिंबा जाहीर केला. हातकणंगले तालुक्यातील सर्व आवाडेप्रेमी कार्यकर्ते आणि जवाहर कारखान्याचे सर्व संचालक सहकार आघाडीच्या विजयासाठी रात्रीचा दिवस करतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
कोणताही उपपदार्थ निर्मिती नसताना राजाराम कारखान्याने जिल्ह्यातील कारखान्यांच्या बरोबरीने दर दिला, हे दुर्मीळ उदाहरण आहे, अशा शब्दांत त्यांनी महादेवराव महाडिक यांच्या पारदर्शक आणि काटकसरीच्या कारभाराचे कौतुक केले. जिल्ह्यात सहकार रुजवणार्‍या मोजक्या लोकांमध्ये महाडिक यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल, असेही आवाडे म्हणाले.

यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांच्यावर सडकून टीका केली. गावाचा सरपंच शब्द पाळतो; पण तुम्हाला मंत्री होऊनही शब्द पाळता आला नाही. राजकारणामध्ये शब्दाला महत्त्व आहे. जो शब्द पाळत नाही त्याची राजकीय कारकीर्द लवकरच संपुष्टात येते, अशा शब्दात खासदार महाडिक यांनी सतेज पाटील यांच्यावर टीका केली. बंटी पाटील यांच्या खुनशी राजकारणाची लवकरच अखेर होईल, असे भाकीत महाडिक यांनी वर्तवले.

यावेळी आघाडीचे उमेदवार संजय मगदूम यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी रुईच्या सरपंच शकिला कोनुरे, उपसरपंच अश्विनी पवार, वसंतराव बेनाडे, अभय काश्मिरे, सुधीर पाटील, जितेंद्र ऐतवडे, प्रकाश पाटील, राजाभाऊ देसाई, आनंदा तोडकर यांच्यासह सभासद शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news