कागलमध्ये साडेसतरा लाखांच्या दागिन्यांसह अडीच लाखांची चोरी | पुढारी

कागलमध्ये साडेसतरा लाखांच्या दागिन्यांसह अडीच लाखांची चोरी

कागल, पुढारी वृत्तसेवा : कागल शहरातील दत्तनगर येथील बंद घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून दोन लाख 50 हजार रुपये रोख रकमेसह 17 लाख 47 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. या घटनेने कागलमध्ये खळबळ उडाली आहे.

सांगाव रोडवरील दत्त कॉलनीमध्ये राहणारे शंकर कृष्णात घाटगे यांचे औषधांचेे दुकान आहे. त्यांच्या घरातील सर्वजण बाहेरगावी गेल्याने ते घराला कुलूप लावून गावातील घराकडे गेले होते. 15 एप्रिलच्या मध्यरात्री 12 ते पहाटे सहाच्या दरम्यान चोरट्याने कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. दोन तिजोर्‍या फोडून त्यातील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरून नेले.

रविवारी सकाळी शेजार्‍यांनी हा प्रकार घाटगे यांच्या निदर्शनास आणला. सोन्याच्या दागिन्यांमध्ये गंठण, बांगड्या, पेंडंट सेट, टॉप्स, सोन्याचा तुकडा, ब—ेसलेट, मिनी गंठण, पेंडंट, चांदीचे पैंजण असे एकूण 17 लाख 47 हजार पाचशे रुपयांचे दागिने चोरीला गेले.

चोरीची तिसरी घटना

गेल्या काही दिवसांत या भागात चोरीची तिसरी घटना घडली आहे. अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी नवले यांनी घटनास्थळी भेट दिली.
चोरट्यांच्या शोधासाठी पाचारण केलेल्या श्वानपथकाने सांगाव रोडपर्यंत दिशा दाखवली. घटनास्थळाचे ठसे घेण्यात आले आहेत.

Back to top button