कागल- सातारा सहा पदरीकरणाचा मार्ग मोकळा

कागल- सातारा सहा पदरीकरणाचा मार्ग मोकळा
Published on
Updated on

कागल ते सातारा सहा पदरीकरणासाठी ( राष्ट्रीय महामार्ग ) आवश्यक भूसंपादन चार महिन्यांत पूर्ण केले जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यात सोमवारी मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. रत्नागिरी-नागपूर महामार्गासाठीही भूसंपादनाचा कालावधी निश्‍चित करण्यात आला. यावेळी पुणे-नगर-औरंगाबाद एक्स्प्रेस जालन्यापर्यंत जोडण्यास केंद्रीय मंत्री गडकरी यांनी मान्यता दिली.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, राष्ट्रीय महामार्ग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या महाराष्ट्रातील प्रकल्पांच्या आढाव्यासंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची बैठक आयोजित केली होती.

राज्यातील महामार्गांचे प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यासाठी मंत्रालयातून नियमित आढावा घेण्यात येणार आहे. राज्यातील राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गांचे प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यासाठी या प्रकल्पांच्या कामांचा मंत्रालयातून नियमित आढावा घेण्यात येणार आहे. भूसंपादन आणि वन विभागाशी संबंधित बाबींमुळे प्रलंबित असलेल्या प्रकल्पांचा लवकरच निर्णय घेऊन ही कामे मार्गी लावण्याचे निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी सचिवांना दिले.

राज्यात राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ या रस्त्यांची कामे करणार्‍या तीन यंत्रणा कार्यरत आहेत. राज्यात सध्या राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांची जे प्रकल्प सुरू आहेत, त्यांना गती देण्यासाठी मंत्रालय स्तरावर मुख्य सचिव या प्रकल्पांचा नियमित आढावा घेणार असून त्यानंतर आपण स्वतः आणि उपमुख्यमंत्र्यांसह दरमहा या प्रकल्पांचा आढावा घेणार असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी सांगितले. राज्य सरकारकडे रस्ते प्रकल्पांशी संबंधित प्रलंबित असलेल्या बाबींवर तत्काळ निर्णय घेऊन महामार्गांची कामे मार्गी लावण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी उपस्थित वरिष्ठ अधिकार्‍यांना दिल्या.

वन जमिनीचे प्रश्‍न सोडविण्यासाठी निवृत्त अधिकार्‍यांची नियुक्‍ती

मराठवाडा, विदर्भ तसेच कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र आणि खानदेशसह विभागीय स्तरावर महामार्गांच्या कामासाठी भूसंपादन आणि वन विभागाशी संबंधित बाबी सोडविण्यासाठी सेवानिवृत्त आयएएस अधिकार्‍यांची नियुक्‍ती करण्याच्या सूचना यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले. वडोदरा-मुंबई एक्स्प्रेस मार्ग, अहमदनगर बायपास, रत्नागिरी-कोल्हापूर, कोल्हापूर-कागल, सांगली-सोलापूर, सूरत-नाशिक- अहमदनगर, अहमदनगर- सोलापूर-अक्‍कलकोट, पुणे-अहमदनगर- औरंगाबाद ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वे, नांदेड-जालना- अहमदनगर- पुणे अशा विविध महामार्गांच्या तसेच रिंग रोडच्या कामांच्या सद्य:स्थितीवर यावेळी चर्चा झाली.

संत तुकाराम महाराज पालखी मार्ग आणि संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी मार्गाचे काम रेंगाळणार नाही, यासाठी राज्य शासनाच्या स्तरावर असलेल्या प्रलंबित बाबी पूर्ण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

मराठवाड्यातील महामार्गांच्या स्थितीविषयी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सूचना मांडल्या. गडचिरोलीतील सिरोंचा-आलापल्ली महामार्गाच्या दुरुस्तीची मंत्री एकनाथ शिंदे यांनी मागणी केली.

यावेळी राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण, राज्य रस्ते विकास महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या वतीने राज्यात सुरू असलेल्या विविध महामार्ग प्रकल्पांची सद्य:स्थिती आणि प्रगती दर्शविणारे सादरीकरण यावेळी करण्यात आले.

मुंबई-गोवा महामार्ग क्राँक्रिटचे बनणार

मुंबई-गोवा महामार्गावर कोकणातील रस्त्यांची अतिवृष्टीमुळे होणारी स्थिती पाहता हे रस्ते सिमेंट काँक्रिटचे बनविण्याची मागणी यावेळी करण्यात आली. त्याला केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सकारात्मकता दर्शवली. मुंबई-गोवा मार्गावर पाच ठिकाणी काम बंद आहे. या महामार्गाचे काम करणार्‍या दहा पैकी पाच कंत्राटदारांचे निलंबन केले जाईल, त्यांची कंत्राटे रद्द केली जातील, असेही गडकरी यांनी सांगितले.

मुंबई-दिल्ली एक्स्प्रेस महामार्गावर महाराष्ट्राच्या हद्दीत कामे बंद आहेत, तेथे आदिवासींचा जमिनीचा विषय आहे, त्याबाबत मार्ग काढू, असे महसूलमंत्री थोरात म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, परिवहन मंत्री अनिल परब, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार सनील तटकरे, खासदार विनायक राऊत यांच्यासह मुख्य सचिव सीताराम कुंटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, महसूल विभाग़ाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सचिव अनिल गायकवाड यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

रत्नागिरी ते कोल्हापूर व्हाया कुंभार्ली घाट रस्ता आता चार पदरी

रत्नागिरी ते कोल्हापूर व्हाया कुंभार्ली घाट हा रस्ता चार पदरी बांधण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. हे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

  • मुख्यमंत्री – नितीन गडकरी यांच्या बैठकीत पुणे – नगर – औरंगाबाद एक्स्प्रेस
    जालन्यास जोडण्यास मान्यता

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news