महाराष्ट्र बंद : कोल्हापुरात काही व्यवहार सुरू, काही बंद; उलाढाल थंडावली | पुढारी

महाराष्ट्र बंद : कोल्हापुरात काही व्यवहार सुरू, काही बंद; उलाढाल थंडावली

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे शेतकर्‍यांना वाहनाखाली चिरडून मारल्याच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. कोल्हापुरात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातील काही भागातील दुकाने सुरू होती, तर धान्य बाजार, शाहूपुरी येथील दुकाने बंद होती. दुपारी चार वाजल्यानंतर दुकाने पूर्ववत सुरू झाली.

अत्यावश्यक सेवा वगळता अन्य व्यवसाय बंद करण्याचे आवाहन महाविकास आघाडीने केले होते. सकाळी शहरातील राजारामपुरी, शाहूपुरी, शिवाजी चौक, लक्ष्मीपुरी धान्य मार्केट ही बंदच होती; पण काही व्यावसायिकांनी आपली दुकाने सुरू ठेवली. अगोदर कोरोनामुळे व्यापार नाही, आता नवरात्रौत्सवात ग्राहक दारात येतात आणि आम्ही दुकाने बंद ठेवणे योग्य नाही, असे म्हणत अनेकांनी या बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. महाद्वार रोड, गुजरी, पापाची तिकटी परिसरात अगोदरच शुकशुकाट आहे. त्यामुळे या ठिकाणी बंदसद‍ृश स्थिती होती.

काही व्यापार्‍यांनी बंदमध्ये सहभाग घेतला असला, तरी ग्राहक आल्यावर शटर उघडून मालाची विक्री केली. व्यापार्‍यांचे बँकिंग व्यवहारही सुस्थितीत चालू होते. दुपारी चारनंतर दुकाने पूर्ववत सुरू झाल्याने दिवसभरातील आर्थिक उलाढालीवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे अनेक व्यापार्‍यांनी सांगितले.

काही व्यापार्‍यांनी शेतकर्‍यांच्या मृत्यूच्या घटनेचा आम्ही निषेध करत असल्याचे सांगून काळ्या फिती लावून काम केले; पण दुकाने बंद करणे हे आर्थिकद‍ृष्ट्या परवडत नसल्याचे सांगितले.

बाजार समितीतील उलाढाल थंडावली

महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदचा बाजार समितीवरही परिणाम झाला. गूळ, भाजीपाल्याचे किरकोळ सौदे वगळता सर्व व्यवहार बंद होते. बंदमुळे बाजार समितीतील अडीच कोटींची उलाढाल ठप्प झाली. बाजार समितीतील 80 टक्के व्यवहार बंद होते.

लखीमपूर खिरीप्रकरणी आघाडी सरकारच्या वतीने बंदचे आवाहन केले होते. यास व्यापार्‍यांनी चांगला प्रतिसाद दिला. दुपारी व्यापारी, शेतकरी व कामगार मुख्य कार्यालयासमोर जमा झाले. यावेळी घोषणा देऊन शेतकर्‍यांवरील भ्याड हल्ल्याचा निषेध केला. यावेळी समितीचे सदस्य सूर्यकांत पाटील यांचे भाषण झाले. बाजार समितीतील व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. भाजीपाला व फळे, गूळ विभागात रविवारी रात्री आलेल्या किरकोळ भाजीपाल्याचे नुकसान होऊ नये म्हणून सौदे काढण्यात आले. त्याचबरोबर चार दिवसांपासून गूळ उत्पादक शेतकर्‍यांचे बॉक्सच्या दरावरून आंदोलन सुरू होते. हे आंदोलन शनिवारी मिटले; पण रविवारी सुट्टी असल्याने सौदे निघाले नव्हते. त्यातच पावसामुळे सौद्यासाठी आणलेला गूळ भिजण्याची भीती शेतकर्‍यांनी व्यक्‍त केली होती. त्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होऊ नये यासाठी गूळ सौदे काढण्यात आले, असेही सदस्य पाटील यांनी सांगितले.

जिल्ह्यातील 500 फेर्‍या रद्द

महाराष्ट्र बंदचा परिणाम एस.टी.च्या प्रवासी वाहतुकीवर झाला. दिवसभरात एस.टी.च्या कोल्हापूर विभागाच्या सुमारे 500 पेक्षा अधिक फेर्‍या रद्द झाल्या, त्यामुळे एस.टी.चा सुमारे 5 लाखांचा महसूल बुडाला. सोमवारी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. एस.टी.ला प्रवाशांअभावी अनेक फेर्‍या रद्द कराव्या लागल्या. दुपारी 12 पर्यंत 560 पैकी 450 फेर्‍या झाला होत्या; पण भारमान कमी राहिले. तीच परिस्थिती दुपारी चारपर्यंत राहिली.

Back to top button