

कसबा सांगाव (कोल्हापूर) : पुढारी वृत्तसेवा
कसबा सांगाव (ता. कागल) येथील कुमारी अनया सुनील चौगुले (वय ८) या मुलीचा सातारा येथे झालेल्या अपघातात मृत्यू झाला. सदर घटनेची नोंद सातारा पोलीस स्टेशनमध्ये झाली आहे. घटनेची माहिती चौगुले कुटुंब राहात असलेल्या महावीर नगर परिसरात समजताच शोककळा पसरली.
अधिक माहिती अशी की, पुण्याहून आपल्या आई-वडिलांसह पुणे येथील नातेवाईकांना भेटून गावी परत येत असताना साताऱ्या जवळील चींदे पिर खिंडी येथे सकाळी साडेदहाच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. सुनील चौगुले आपली पत्नी, मुलगी अनया व चार वर्षाचा मुलगा यांना चारचाकी (एमएच ०९ इ. जी. ०४२८) गाडीतून परत येत होते. समोर असणाऱ्या गाडीचा वेग अचानक कमी झाल्याने सुनील याने ब्रेक मारला त्यामुळे मागील सीटवर बसलेली अनया खिडकीतून बाहेर फेकली गेली. तर चारचाकी त्याच ठिकाणी पलटली. या अपघातात अनयाच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. तर सुदैवाने गाडीमध्ये अडकलेल्या अन्य कोणालाही गंभीर इजा झाली नाही.
सातारा जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री उशिरा मृतदेहावर महावीर नगर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.