सतेज पाटील घाबरले; विरोधकांत दम नाही : अमल महाडिक | पुढारी

सतेज पाटील घाबरले; विरोधकांत दम नाही : अमल महाडिक

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  सतेज पाटील घाबरले, ते बिंदू चौकात आले नाहीत. त्यांची नीतिमत्ता खोटी आहे. विरोधकांत दम नाही, अशी जहरी टीका माजी आमदार अमल महाडिक यांनी शुक्रवारी बिंदू चौकात केली. राजाराम कारखान्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नांवर जाहीर माहिती देतो, तुम्हीही डी. वाय. पाटील कारखान्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे बिंदू चौकात येऊन द्या. आपण सायंकाळी सात वाजता बिंदू चौकात येतो, असे आव्हान अमल महाडिक यांनी शुक्रवारी सकाळी वडणगे येथे सभेत दिले होते. त्यानुसार सांयकाळी साडे सात वाजता ते समर्थकांसह बिंदू चौकात आले. त्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.

डी. वाय. पाटील कारखान्यासंबंधी माहिती विचारली

आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्याला कुठेही गालबोट लागू नये, हीच आपली भूमिका होती. पण ज्या पद्धतीने गुरूवारी एका ठिकाणी व्यासपीठावर माझ्या विरोधकांनी मला आव्हान दिले. यामुळे याच बिंदू चौकात येण्याचे आव्हान मी त्यांना केले होते. मी सात साडेसातच्या सुमारास येतोय. ही निवडणूक कारखान्याची आहे ती व्यक्तीशः नाही. ज्या पद्धतीने राजाराम कारखान्याबाबत मी बिंदू चौकात जाहीरपणे कारखान्याची संपूर्ण माहिती देण्यासाठी सतेज पाटील, यांना आव्हान दिले होते. पण ते आलेले नाहीत. त्यांच्या कारखान्याची माहिती विचारली होती. त्यांनी आणि आम्ही दोघांनी एकमेकांसमोर येऊन माहिती देण्याचा शब्द मी त्यांना दिला होता, असे अमल महाडिक म्हणाले.

चॅलेंजला उत्तर द्या

त्यांनी त्यांच्या कारखान्याची माहिती बिंदू चौकात येऊन द्यावी. माझ्या चॅलेंजला त्यांनी उत्तर द्यावे, आज आम्ही घाबरलो नाही तर ते घाबरले. त्यांनी त्यांच्या डी.वाय.पाटील कारखान्यासंदर्भात मी विचारलेली माहिती जाहीरपणे सांगावी, हाच आमचा त्यांच्या विचारलेला जाब आहे. पण ते ही माहितीसुद्धा देऊ शकत नाही, कारण त्यांची नितिमत्ता खोटी आहे, त्यांच्याकडे उत्तर नाही त्यामुळे ते स्वत: आलेले नाहीत. विरोधक काहीही सांगतात, त्यांच्यात दम नसल्याचे अमल महाडिक म्हणाले.

आव्हान सतेज पाटील यांना

आमदार ऋतुराज पाटील येत आहेत, त्यांच्याशी चर्चा करणार का? असे विचारता महाडिक म्हणाले, मी सतेज पाटील यांना आव्हान दिले आहेे. त्यांना मी विचारले होते. ज्यावेळी डी. वाय. पाटील दादा विचारतील त्यावेळी माजी आमदार महादेवराव महाडिक उत्तर देतील असे म्हणत अन्य कोणाशी बोलण्याची मला गरज नाही, असेही त्यांनी सांगितले. यावेळी माजी नगरसेवक सत्यजित कदम, अजित ठाणेकर, विजयसिंह खाडे-पाटील, किरण नकाते, नंदकुमार वळंजू, संग्राम निकम, महेश वासूदे, रहीम सनदी आदींसह महाडिक समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button