वादळी वळवाने कोल्हापूरला झोडपले

वादळी वळवाने कोल्हापूरला झोडपले
Published on
Updated on

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  भयभीत करणारा विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटात, वादळी वार्‍यासह शुक्रवारी रात्री वळवाने कोल्हापूर शहरासह परिसराला अक्षरश: झोडपून काढले. सुमारे दीड तास पाऊस धो धो कोसळला. एस. टी. कॉलनी, वर्षानगर आणि राजारामपुरी, मंडलिक पार्क येथे महादेव मंदिरजवळील नारळाच्या झाडांवर वीज कोसळली. चारचाकी, चहाच्या टपरीवर झाड कोसळले. पावसाने वीजपुरवठा खंडित झाल्याने शहरासह बहुतांशी जिल्हा सुमारे तीन तास अंधारात होता. मध्यरात्रीनंतरही वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता.

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात अनेक भागात शुक्रवारी सायंकाळनंतर मेघगर्जनेसह पाऊस होईल असा हवामान विभागाचा अंदाज होता. सकाळपासून वातावरण ढगाळ होते. पाराही 36.7 अंशापर्यंत खाली आला होता. यामुळे शुक्रवारी पावसाची शक्यता होतीच. दरम्यान, शहर आणि परिसरात वीज कोसळण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी दक्षता घ्यावी, असा अलर्ट जिल्हा प्रशासनाने सायंकाळी सातच्या सुमारास दिला होता. यानंतर काही वेळातच जोरदार वार्‍यासह पाऊस सुरू झाला. गेल्या काही दिवसांपासून शहरात दमदार वळीवाची प्रतिक्षा होती. शुक्रवारी प्रथमच दमदार वळवाने हजेरी लावली. रात्री साठेआठच्या सुमारास जोरदार वारे सुटले. वार्‍याचा जोर इतका होता, अनेक ठिकाणी फलक फाटले, कचरा मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आला होता. अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटल्या. बेलबाग परिसरात एका चारचाकीवर तर कदमवाडी परिसरात एका चहाच्या टपरीवर झाड कोसळले. यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.

धडकी भरवणारा सोसाट्याचा वारा

सुमारे अर्धा तास सोसाट्याचा वारा होता. या वार्‍याने अनेकांच्या मनात धडकी भरवली. रात्री नऊच्या सुमारास पावसाला सुरवात झाली. काही वेळातच पावसाचा जोर वाढला. धुवाँधार सरी बसरत होत्या, यामुळे नागरिकांची प्रचंड तारांबळ उडाली. विक्रेते, व्यापार्‍यांची धावपळ उडाली. लोक जागा मिळेल तिथे आडोश्याला थांबले. अनेक रस्त्यावरील वर्दळ कमी झाली. डॉ.आंबेडकर जयंती निमित्त आयोजित विविध कार्यक्रमातील नागरीकांची तसेच अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची पावसाने त्रेधातीरपीट उडाली. रंकाळा चौपाटीसह विविध बागा तसेच घराबाहेर फिरण्यासाठी पडलेल्यांचेही चांगलेच हाल झाले. अनेकांनी भिजतच घर गाठले.

जोरदार वारे आणि त्यानंतर पाऊस यामुळे शहरातील अनेक ठिकाणी 33 केव्ही आणि 11 केव्हीच्या विद्युत वाहीनीवर झाडांच्या फांद्या पडल्या. यामुळे सबस्टेशन आणि फिडर बंद करून वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. परिणामी संपूर्ण शहरासह जिल्ह्यातील काही गावे अंधारात बुडाली. सुमारे तीन तास वीज बंद राहीली.

काही ठिकाणी पाणी साचले

पावसाने शहराच्या काही भागात पाणी साचले. व्हिनस कॉर्नर परिसर, सीपीआर चौक, जयंती नाला आदी ठिकाणी पाणी साचले. साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना वाहनचालकांसह पादचार्‍यांना कसरत करावी लागत होती. शहरासह उपनगर आणि परिसरालाही दमदार पावसाने झोडपून काढले. शहरालगतच्या गावातही पाऊस झाला. पावसाने हवेत गारठा वाढला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news