तिरुपतीच्या धर्तीवर जोतिबा प्राधिकरणाचा विकास

तिरुपतीच्या धर्तीवर जोतिबा प्राधिकरणाचा विकास

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  तिरुपती देवस्थानच्या धर्तीवर श्री क्षेत्र जोतिबा परिसर संवर्धन प्राधिकरणाचा विकास केला जाईल. याकरिता संबंधित सर्व विभागांनी भौगोलिक परिस्थितीनुसार आठ दिवसांत आराखडे सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी गुरुवारी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात प्राधिकरणाचा प्राथमिक आराखडा तयार करण्याबाबत पहिली बैठक झाली.

राज्य शासनाने श्री क्षेत्र जोतिबा विकासासाठी प्राधिकरण स्थापन केले आहे. त्यानुसार या प्राधिकरणाची रचना, नियमावली याचे काम अंतिम टप्प्यात आल्याचे रेखावार यांनी सांगितले. धार्मिक क्षेत्राबरोबर हा सर्व परिसर राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणूनही विकसित कसा करता येईल, दर्शनासाठी आलेले भाविक दर्शन झाल्यानंतर पर्यटक म्हणून सहकुटुंब डोंगर आणि परिसरात राहू शकतील या द़ृष्टीने प्रत्येक विभागाने आपल्या विभागाकडून कोणत्या योजना राबविता येतील, त्याचा आराखडा सादर करावा, असेही त्यांनी सांगितले.

या प्राधिकरणात समाविष्ट गावात कोणत्या सुविधा उपलब्ध करून देता येतील, त्यातून गावांचा विकास होण्यासाठी विविध योजना, उपक्रमांचा आराखड्यात समावेश करावा, अशा सूचनाही त्यांनी संबंधित विभागांना दिल्या. त्यांच्याकडून आलेल्या प्रस्तावानुसार एकात्मिक आराखडा तयार केला जाईल. या प्राधिकरणाचा आराखडा तयार करण्यासाठी सल्लागारांची नेमणूक केली जाणार आहे. त्यांच्या संकल्पना आणि हा प्राथमिक आराखडा याचा अभ्यास करून अंतिम आराखडा तयार केला जाणार असल्याचेही रेखावार यांनी सांगितले.

विकास आराखड्यासाठी व्यक्ती, संस्था नेमणुकीसाठी निविदा प्रसिद्ध

जोतिबा प्राधिकरणाचा एकात्मिक विकास आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार व्यक्ती किंवा संस्थेची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याची निविदा प्रसिद्ध केली आहे. अधिक माहितीसाठी http:/// mahatenders. gov. in  संकेतस्थळास भेट द्यावी, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. बी. काटकर यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news