ना विद्यापीठ, ना कॉलेज… प्राध्यापक भरतीच्या मुलाखती चक्क हॉटेलात! | पुढारी

ना विद्यापीठ, ना कॉलेज... प्राध्यापक भरतीच्या मुलाखती चक्क हॉटेलात!

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  बहुचर्चित राज्यातील प्राध्यापक भरतीला सुरुवात झाली आहे. कोल्हापूर विभागातील प्राध्यापक पदाची भरती ना विद्यापीठ, ना कॉलेजमध्ये ठेवता एका शिक्षण संस्थेने चक्क हॉटेलमध्ये सहायक प्राध्यापकपदाच्या मुलाखती घेतल्या. राज्यातून आलेल्या उमेदवारांची सोय व्हावी, म्हणून हॉटेलमध्ये मुलाखती घेतल्याचे सांगितले जात आहे. हॉटेल प्राध्यापकांच्या घेतलेल्या मुलाखतीबाबत सोशल मीडियावर दिवसभर चर्चा मात्र रंगली होती.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधीमंडळ अधिवेशनात सहायक प्राध्यापक भरतीची घोषणा केली होती. त्यानुसार राज्यातील महाविद्यालयातील 2088 जागा येत्या काही दिवसांत भरण्यात येणार आहेत. शिवाजी विद्यापीठांतर्गत असणार्‍या कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील महाविद्यालयांमध्ये नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी नवीन प्राध्यापक भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्राध्यापक भरतीत आर्थिक गैरव्यवहार होतात, यामुळे भरती इन कॅमेरा व्हावी, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, त्यास ‘खो’ बसला आहे.

कोल्हापूर विभागातील 463 सहायक प्राध्यापक पदाच्या भरण्यात येणार आहेत. यातील 79 जागा या कला, वाणिज्य, विज्ञान शाखेच्या भरल्या आहेत. दरम्यान, बुधवारी गगनबावडा तालुक्यातील एका खासगी संस्थेने त्यांच्या कॉलेजमधील गणित विषयाच्या सात जागांसाठी शहरातील मध्यवर्ती एका हॉटेलमध्ये सकाळी 11 वाजता मुलाखती ठेवल्या होत्या. याबाबत सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले होते. याची माहिती मिळताच युवा सेनेच्या पदाधिकार्‍यांनी मुलाखतीच्या ठिकाणी जाऊन संस्थेच्या पदाधिकार्‍यांना धारेवर धरले. महाविद्यालय, विद्यापीठ सोडून भरती प्रक्रिया राबविण्याचा नवा फंडा निर्माण झाला आहे. शासन मुलाखती घेण्यासाठी टीए डीए व मानधनाशिवाय काहीच देत नाही. हॉटेलचा खर्च शासन नियमात बसत नाही. हा खर्च उमेदवारांच्या माथी मारणार का? असा सवाल सोशल मीडियावर विचारला जात आहे.

Back to top button