District Bank : महाविकास आघाडी जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार

District Bank : महाविकास आघाडी जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार
Published on
Updated on

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची (District Bank) निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवणार असल्याचे बँकेचे चेअरमन, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील आणि आ. पी. एन. पाटील यांच्यात शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत आ. विनय कोरे, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांसोबत सविस्तर बैठक दसरा सण झाल्यानंतर घेण्याचे यावेळी ठरले.

जिल्हा बँक निवडणुकीची (District Bank Election) रणधुमाळी सुरू झाली असून, सत्ताधारी आणि विरोधी आघाडीने आपल्यास्तरावर जोडण्या सुरू केल्या आहेत. शिवसेनेने किमान चार, आ. विनय कोरे यांनी तीन तसेच राजू शेट्टी यांनी एका जागेची मागणी केली आहे. यापार्श्वभूमीवर आ. विनय कोरे यांच्यासोबत मागील दोन आठवड्यांपासून काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते बैठक घेऊन चर्चा करीत आहेत. परंतु, या-ना त्या कारणाने ही बैठक लांबणीवर पडत आहे. दरम्यान, निवडणुकीची प्राथमिक दिशा ठरविण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शासकीय विश्रामगृह येथे बैठकीत चर्चा केली.

बैठकीनंतर माहिती देताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, हायकोर्टात सिंधुदुर्ग, पुणे आणि कोल्हापूर जिल्हा बँकेच्या मतदार यादीबाबत सुनावणी सुरू आहे. 17 ऑक्टोबरपर्यंत निवडणूक कार्यक्रम सुरू करू नका, असे न्यायालयाने सांगितले आहे. मतदार यादी निश्चित झाल्यानंतर दहा ते वीस दिवसांच्या दरम्यान निवडणूक कार्यक्रम सुरू कराव्यात, असे कायदा सांगतो. यामुळे 17 ऑक्टोबरला बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल.

पॅनेल रचना कशी असावी? याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली. आ. विनय कोरे यांच्या गटाच्या एका सरपंचाचा मृत्यू झाल्याने ते बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. दसरा झाल्यानंतर कोरे यांच्याशी बैठक घेतली जाईल. याच दरम्यान शिवसेनेच्या नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. ज्या बारा तालुक्यात सेवा संस्थांचे उमेदवार आहेत. त्या ठिकाणी आम्ही कोणीच हस्तक्षेप करू शकत नाही. ज्याच्या त्याच्या ताकदीवर तालुक्यातील नेते लढतील.

काही ठिकाणी बिनविरोध होईल, कोणाला बिनविरोध करायची नसल्यास कोणीतरी कोणालातरी निवडणुकीसाठी उभे करेल? या सर्व गोष्टी घडणार त्याला इलाज नाही. कोणाला किती जागा याबाबत अद्याप काही ठरलेले नाही. शिवसेना, आ. कोरे, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्याशी चर्चा करणार असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.

फक्त बिनविरोधाची विनंती करू : मुश्रीफ

उत्कृष्ट काम करत सर्व संस्थांना मदतीचा हात दिला. बँकेची प्रगती केली. सत्ताधारी असल्याने बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, असे आवाहन केले. मात्र, जिल्हा बँकेची निवडणूक कधीच बिनविरोध होत नाही. बँकेची निवडणूक बिनविरोध करावी, अशी विनंती मात्र करू, असे मुश्रीफ म्हणाले.

एकत्र लढणार हे निश्चित : पालकमंत्री

जिल्हा बँक निवडणुकीत मागील वेळी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि जनसुराज्य पक्ष यांनी किती जागा लढल्या होत्या, याचा आढावा बैठकीत घेतला. या बैठकीत जिल्हा बँक निवडणुकीच्या प्राथमिक व्यूहरचना कशी असावी. याबाबत चर्चा केली. लवकरच शिवसेना, जनसुराज्य पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबत बैठक घेतली जाईल. ही निवडणूक आम्ही सर्वजण एकत्रपणे लढणार हे मात्र निश्चित ठरले आहे, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news