कोल्हापूर : ई-पास साठी आठवड्यात सव्वा कोटीहून अधिक भाविकांचे प्रयत्न | पुढारी

कोल्हापूर : ई-पास साठी आठवड्यात सव्वा कोटीहून अधिक भाविकांचे प्रयत्न

कोल्हापूर ; सागर यादव : कोरोनामुळे सहा महिन्यांहून अधिक काळ बंद असणारे करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे मंदिर नवरात्रौत्सवानिमित्त घटस्थापनेदिवशी दर्शनासाठी खुले झाले. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन व देवस्थान समितीच्या वतीने यंदा प्रथमच ई-पास ची व्यवस्था केली आहे.

याला राज्यासह देशभरातील भाविकांचा भरघोस प्रतिसाद मिळत असून 1 ते 7 ऑक्टोेबर या कालावधीत तब्बल सव्वाकोटी भाविकांनी ऑनलाईन ई-पाससाठी प्रयत्न केले. यापैकी 1 लाख 50 हजारांहून अधिक भाविकांना दर्शनासाठीचे पास उपलब्ध झाले असून, पहिल्या सत्रात (रविवारपर्यंत) यापैकी सुमारे 75 हजारांहून अधिक भाविकांनी प्रत्यक्ष दर्शन घेतले.

जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने ऑनलाईन ई-दर्शन पाससाठी वेबसाईट सुरू केली आहे. या पाससाठी भाविकांनी नवरात्रौत्सवाच्या एक आठवडा आधीपासूनच प्रयत्न सुरू केले होते.

1 ते 7 ऑक्टोबर या कालावधीत अनुक्रमे 10, 12, 19, 34 व 20 लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन पाससाठी वेबासाईटला भेट दिल्याच्या हिटस्ची नोंदणी झाली आहे. सर्वाधिक हिटस् घटस्थापनेच्या आदल्या दिवशी म्हणजेच दि. 6 ऑक्टोबर रोजी 34 लाख 54 हजार 490 इतक्या होत्या.

प्रत्यक्ष वेबसाईट कार्यान्वित झाल्यानंतर 7 ते 12 ऑक्टोबर या कालावधीसाठी अंबाबाईच्या दर्शनासाठी 1 लाख 10 हजार 303 भाविकांना तर दख्खनचा राजा जोतिबाच्या दर्शनासाठी 49 हजार 265 भाविकांना ई-पास उपलब्ध झाले. रविवारपर्यंत यापैकी 75 हजार भाविकांनी अंबाबाई व जोतिबाचे दर्शन घेतल्याच्या नोंदी देवस्थान समितीकडे झाल्या आहेत.

Back to top button