कांदा उत्पादकांना मिळणार अनुदान | पुढारी

कांदा उत्पादकांना मिळणार अनुदान

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  राज्य शासनाच्या निर्णयानुसार कांदा उत्पादक शेतकर्‍यांना अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी अनुदानाचे अर्ज सादर करावेत, असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे. कोल्हापूर बाजार समितीकडे आतापर्यंत सुमारे 350 शेतकर्‍यांनी यासाठी अर्ज दाखल केले आहेत.

कोल्हापूर बाजार समितीचे सचिव जयवंत पाटील म्हणाले, फेब—ुवारी व मार्च 2023 या महिन्यांत राज्यात कांद्याचे दर गडगडले होते. दर पडल्याने शेतकर्‍यांना कांदा रस्त्यावर ओतून टाकण्याची वेळ आली होती. विधिमंडळात हा प्रश्न चर्चेला गेला. त्यावर शासनाने कांदा उत्पादक शेतकर्‍यांना प्रतिक्विंटल 350 रुपये अनुदान जास्तीत जास्त 200 क्विंटलपर्यंतच्या कांद्यास दिले जाईल, असे जाहीर केले होते. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. कोल्हापूर बाजार समितीमध्ये पुणे, नाशिक, सातारा या जिल्ह्यांतील शेतकरी कांदा घेऊन येत आहेत. संबंधित जिल्ह्यातील शेतकरी आपले अर्ज बाजार समितीमध्ये घेऊन दाखल करत आहेत. आतापर्यंत सुमारे 350 शेतकर्‍यांचे अर्ज दाखल झाले आहेत. या अर्जासोबत कांदा विक्रीची मूळ पट्टी, कांदा पिकाची नोंद असलेला सात-बारा उतारा, बँक पासबुकच्या पहिल्या पानांची छायांकित प्रत, कांदा व विक्री पट्टी, मुलांच्या अथवा अन्य कुटुंबीयांच्या नावे कांदा विक्री झाली असल्यास अशा प्रकरणामध्ये सात-बारा ज्यांच्या नावावर आहे, त्यांची शपथपत्र जोडले जात आहे. या अनुदानासाठी शेतकर्‍यांनी 20 एप्रिलपर्यंत अर्ज सादर करावयाचे आहेत.

Back to top button