सीपीआरमधील ‘आरोग्यदूत’ | पुढारी

सीपीआरमधील ‘आरोग्यदूत’

कोल्हापूर ; एकनाथ नाईक : कोरोना असो किंवा अन्य कोणताही आजार असो, ‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा,’ अशी प्रतिज्ञा घेऊन वैद्यकीय क्षेत्रात आलेल्या परिचारिका कोरोनाच्या संकट काळात रुग्णांसाठी ‘देवदूत’ ठरल्या. आपल्या जीवाची बाजी लावून, बारा-बारा तास पीपीई किट घालून सीपीआरमधील नवदुर्गांनी दिलेल्या वैद्यकीय सेवेमुळे आज लाखोंचे प्राण वाचले आहेत. आजही सुमारे 550 हून अधिक नवदुर्गा परिचारिकेच्या रूपात रुग्णसेवेत तत्पर आहेत.

सलग 6 ते 12 तास ड्युटी… जेवायलादेखील उसंत नाही, नातेवाईकांनी अनेक रुग्णांना वाळीत टाकून रुग्णालयांतून पळ काढला, अशा गंभीर परिस्थितीत कोरोनाबाधितांना आधार देऊन आजाराच्या दाढेतून रुग्णांना बाहेर काढण्यात नर्सेस यांचा मोठा सहभाग आहे. इतकेच नाही, तर रुग्णसेवेदरम्यान रुग्णांचे समुपदेशन करून आजाराची भीती त्यांच्या मनातून घालवून नवी उमेद देत आहेत.

रुग्णांच्या नातेवाईकांपेक्षा नर्सेस अधिक काळ रुग्णसेवेत असतात. रुग्णाला काय हवे, काय नको यासह रुग्णांची आरोग्याची होणारी दैनंदिन प्रगती नातेवाईकांपर्यंत पोहोचवण्याचा दुवा म्हणून अनेकवेळा त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.

कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत रुग्णांच्या हसत-खेळत उपचारावर सीपीआरमधील परिचारिका विशेष भर देत आहेत. जेणेकरून रुग्णांवर आजाराचे दडपण येणार नाही. जिथे रक्ताच्या नात्यांनी लाथाडले, तिथे सीपीआरच्या परिचारिकांनी कोरोनाबाधित रुग्णांना मायेची ऊब दिली.

कोरोना महामारीत परिचारिकांना पाणी पिण्यासाठीदेखील उसंत मिळत नव्हती. त्यात पीपीई किटमुळे श्वास कोंडला जायचा. अशा परिस्थितीत त्या लढल्या. त्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन ड्युटी 6 तासांची करण्यात आली. वेळेपेक्षा परिचारिकांनी रुग्णसेवेलाच प्राधान्य दिले आहे.

Back to top button