कोरोनाविरूद्ध चाचपणीसाठी देशात मॉकड्रिल! | पुढारी

कोरोनाविरूद्ध चाचपणीसाठी देशात मॉकड्रिल!

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  देशातील कोरोनाचा संसर्ग अधिक जोमाने वाढत आहे. कोरोना उतरणीला लागल्यापासून 203 दिवसांनी शुक्रवारी प्रथमच 6 हजार 50 नवे रुग्ण दाखल झाले. आठवडाभरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत तब्बल 98 टक्क्यांची भर पडल्यामुळे केंद्र सरकार खडबडून जागे झाले आहे. कोरोनाच्या संकटाला समर्थपणे तोंड देण्यासाठी आरोग्य यंत्रणेची सज्जता तपासून पाहण्याकरिता दिनांक 10 व 11 एप्रिल रोजी मॉकड्रिल घेण्याचे आदेश दिले.

देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येच्या आलेखामध्ये मार्चच्या दुसर्‍या पंधरवड्यापासून गती आली. 17 मार्च रोजी कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या 571 होती आणि उपचारार्थी रुग्णांची संख्या 15 हजार 119 होती. यानंतर दररोज सरासरी 4 हजार 188 रुग्ण नव्याने दाखल होत आहेत आणि शुक्रवारी ही रुग्णसंख्या 29 हजार 318 वर पोहोचली आहे. देशातील कोरोना संसर्गाचा सरासरी दर 3.0 टक्क्यांवर, तर 8 राज्यामधील 10 जिल्ह्यांत हा दर 10 टक्क्यांंवर आहे. केरळ, महाराष्ट्र, दिल्ली या राज्यांमध्ये रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी एक आढावा बैठक घेतली होती.

आरोग्यमंत्र्यांनी देशात सध्या कोरोनाचे ओमिक्रॉन आणि त्याची उपरूपे कार्यरत असल्याची माहिती दिली. या विषाणूची संसर्ग पसरविण्याची क्षमता आणि रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाणही कमी असले, तरी त्याकडे कानाडोळा करून चालणार नाही, असे स्पष्ट केले. देशातील 23 राज्यांमध्ये कोरोनाच्या चाचण्यांचे प्रमाणही अत्यल्प आहे. सध्या दर 1 लाख लोकसंख्येमागे 100 चाचण्या हे प्रमाण निश्चित केले असले, तरी संबंधित राज्यांमध्ये त्यापेक्षाही कमी चाचण्या होतात, याकडे लक्ष देताना त्यांनी लसीकरणाची मोहीम आणि चाचण्यांची संख्याही वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

नव्या लक्षणांची भर

कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होत असताना देशात कोरोनाच्या लक्षणांमध्येही काही नवी लक्षणे समाविष्ट झाली आहेत. विशेषतः लहान मुलांच्या डोळ्याला संसर्ग होण्याचे प्रमाण आढळून आले. लहान मुलांचे डोळे चिकटणे, हा त्यातीलच एक भाग आहे. हे लक्षण यापूर्वीच्या लाटेमध्ये आढळून आले नव्हते. गेल्या 6 महिन्यांनंतर कोरोनाबाधित बालकांची संख्या वाढत असल्याचे इंडियन अ‍ॅकॅडमी ऑफपेडियाट्रिक्सचे पदाधिकारी आणि बिजनोरच्या मंगला हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे सल्लागार, बालरोगतज्ज्ञ डॉ. विपीन विशिष्ठ यांनी म्हटले आहे.

Back to top button