कोल्हापूर जि.प.ची शाळा ग्लोबल | पुढारी

कोल्हापूर जि.प.ची शाळा ग्लोबल

कोल्हापूर, डॅनियल काळे : शाळा, त्यातही जिल्हा परिषदेची शाळा म्हणजे काळा फळा, पांढरा खडू, डस्टर अथवा फळा पुसण्यासाठी कापड हे पारंपरिक चित्र कोल्हापुरातील उचगावच्या यादववाडी विद्यामंदिरने बदलून दाखवले आहे. ‘स्मार्ट टू ग्लोबल’ या प्रवासात आता शाळेचे सर्व 13 वर्ग हायटेक झाले आहेत. विद्यार्थ्यांना स्मार्ट बोर्डद्वारे शिक्षण दिले जात आहे. या नव्या उपक्रमाद्वारे शाळेचे विद्यार्थी जगभरातील कोणत्याही शाळेला किंवा ठिकाणाला व्हर्च्युअल भेट देऊन ज्ञान संपादन करू शकतात, अशी झेप या शाळेने घेतली आहे. पुस्तकातील आशय अ‍ॅनिमेशन स्वरूपात पाहून ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबांतील विद्यार्थी हायटेक धडे गिरवत जगाशी कनेक्ट झाले आहेत.

अध्यापक रवींद्र केदार यांनी त्यांच्या वर्गात ‘स्मार्ट टू ग्लोबल क्लासरूम’ हा महत्त्वाकांक्षी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवला होता. विद्यार्थ्यांमधील सकारात्मक बदल लक्षात घेऊन संपूर्ण शाळेसाठी त्यांच्या संकल्पनेतून ‘स्मार्ट टू ग्लोबल स्कूल’साठी लोकसहभागातून सुमारे तीन लाख एवढा निधी जमा करून सुरुवात झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण व जिल्हाधिकारी राहुल रेखावार, आ. ऋतुराज पाटील यांनी या नवोपक्रमाची उपयुक्तता ओळखत ‘स्मार्ट टू ग्लोबल स्कूल’ या उपक्रमाला जिल्हा नियोजन मंडळातून 33 लाख एवढा निधी दिला. तंत्रज्ञानाच्या मदतीने गोरगरिबांच्या लेकरांना आधुनिक शिक्षण मिळणार आहे. हा उपक्रम राज्यातील सर्वच शाळांना दिशादर्शक ठरत आहे.

ग्लोबल शाळेची प्रमुख वैशिष्ट्ये  

सर्व वर्गात वेगवान इंटरनेट कनेक्शन, एलईडी इंट्रॅक्टिव्ह स्मार्ट बोर्ड, प्रशस्त संगणक कक्ष, ग्रंथालय, बायोमेट्रिक शिक्षक हजेरी, सोलर पॅनेल, डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम सायन्स अँड टेक्नॉलॉजी प्रयोगशाळा, आवश्यक क्रीडा साहित्य, लॅपटॉप, टॅब्लेटस्, प्रिंटर, करा ओके सिस्टीमची व्यवस्था वर्गातच केली आहे.

Back to top button