कोल्‍हापूर : पंचगंगा नदीतून बॅकवॉटरने कृष्णा नदीचा प्रवास सुरू | पुढारी

कोल्‍हापूर : पंचगंगा नदीतून बॅकवॉटरने कृष्णा नदीचा प्रवास सुरू

कुरुंदवाड (जि. कोल्हापूर) : पुढारी वृत्तसेवा –  राजापूर (ता. शिरोळ) बंधाऱ्याची पाणी पातळी दहा फूट तीन इंच झाल्याने कृष्णा नदीच्या बॅक वॉटरचे पाणी शिरोळ बंधाऱ्यापर्यंत आले आहे. चार ते पाच क्युसेक्स पाणी आज तेरवाड बंधाऱ्यापर्यंत पोहोचणार आहे. पाटबंधारे विभागाकडून शिरोळ बंधाऱ्यातून पाणी तेरवाड बंधाऱ्यापर्यंत येण्यास वाळूचा व भरावाचा अडथळा दूर करण्यात आल्याने कृष्णा नदीच्या बॅक वॉटरचा पंचगंगा नदी पात्रातून प्रवास सुरू झाला आहे.

पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत घट झाल्याने शिरडून पुलाजवळ नदीपात्र कोरडे पडले आहे. तर शिरोळ बंधाऱ्याजवळ पूर्ण नदी कोरडी झाली आहे. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत कमालीची घट होऊन आठ दिवसांपूर्वी राजापूर बंधाऱ्याजवळ हिप्परगी धरणाच्या बॅक वॉटरच्या पाण्यामुळे केवळ तीन फूट इतकीच पाणी पातळी राहिली होती. कोयना धरणातून 2100 क्यूसेक्सने तर वारणा नदीतून 1300 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून राजापूर बंधाऱ्याला दहा फुटाने बर्गे घातल्याने पाणीपातळी दहा फूट तीन इंच झाली आहे. त्यामुळे बॅक वाटरने दिनकरराव यादव पुलाखालून शिरोळ बंधाऱ्यापर्यंत पाणी आले आहे.

शिरोळ बंधाऱ्याजवळ वाळू साचल्याने बॅकवॉटरचे पाणी येण्यास अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने जेसीबीने नदीत चर मारून पाणी घेण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. आज बॅक वॉटरचे 5 क्यूसेक्स पर्यंत पाणी तेरवाड बंधाऱ्यापर्यंत मिळणार असल्याची माहिती पाटबंधारे अधिकारी आर. आय कोळी यांनी दिली. त्यामुळे तेरवाड बंधाऱ्यापर्यंतच्या शेतीचा आणि पाणी योजना असणाऱ्या गावांना काही दिवसांसाठी का असेना कृष्णेचे पाणी पिण्यासाठी मिळणार आहे.

Back to top button