कुरूंदवाड : दैनिक पुढारीच्या वृत्ताची दखल; मृत डुकरे नदीत टाकणाऱ्यां विरूद्ध पालिका करणार गुन्हे दाखल | पुढारी

कुरूंदवाड : दैनिक पुढारीच्या वृत्ताची दखल; मृत डुकरे नदीत टाकणाऱ्यां विरूद्ध पालिका करणार गुन्हे दाखल

कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा कुरुंदवाड येथे अज्ञात आजाराने मृत झालेली डुकरे अनवडी नदीत टाकण्यात आली होती. यामुळे पसरलेल्‍या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्‍याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्‍याचे वृत्‍त दैनिक पुढारीने प्रसिद्ध केले होते. पालिका प्रशासनाने दैनिक पुढारीच्या वृत्ताची दखल घेऊन सदर मृत डुकरांची विल्हेवाट लावायला सुरुवात केली आहे. उघड्यावर डुकरे टाकून हवा आणि पाणी या दोन्हीचे प्रदूषण करणाऱ्या मालकांच्यावर गुन्हे दाखल करण्याची तयारी पालिका प्रशासनाने सुरू केली आहे.

दरम्यान कुरुंदवाड मध्ये मृत डुकरांची पसरली दुर्गंधी, नागरिकांचे आरोग्य धोक्यात या मथळ्याखाली दैनिक पुढारीने प्रसिद्ध केलेले वृत्त. शहरात चर्चेचा विषय ठरले होते. या वृत्‍ताने जागे झालेल्‍या पालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागाने नैसर्गिक पद्धतीने या मृत डुकरांची विल्हेवाट लावायला सुरुवात केली आहे. डुकरांच्या आजाराबाबत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना याची कोणतीच कल्पना नाही असे सांगून त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली.

कुरुंदवाड येथील अनवडी नदीजवळ भैरवाडी पुलाखाली पोत्यात व चटईमध्ये मृत डुकरे टाकली आहेत. यामुळे अनवडी नदी पूर्णता प्रदूषित झाली आहे. पूला लगतच खड्ड्यात टाकलेल्या जनावरांची दुर्गंधी सुटल्याने नाईक गल्लीतील नागरिकांनी तक्रार केली होती. पालिका प्रशासनाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होते. प्रशासनाने उघड्यावर असलेली मृत डुकरे काही ठिकाणी जेसीबीने खड्डा काढून दफन केली आहेत, तर काही ठिकाणी ती जाळून विल्हेवाट लावली आहे.

नदीतील मृत डुकरांचे करणार काय?

दैनिक पुढारीने याचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर आज (शुक्रवार) सकाळी सात वाजल्यापासून दहा ते पंधरा मृत डुकरे जेसीबीने खड्डा काढून गोठणपूर परिसरात दफन करण्यात आली आहेत. अनवडी नदी पुलाजवळ खड्ड्यातील मृत डुकरे जाळत असताना कोरवी वसाहती लगत आज पहाटेपासून मोठी दुर्गंधी सुटल्याने आरोग्य विभागाने त्या ठिकाणची ही पाहणी केली. त्‍यावेळी त्या ठिकाणी आणखीन दहा मृत डुकरे टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्‍त करण्यात येत आहे.

हेही वाचा : 

Back to top button