कोल्हापूर : जोतिबा यात्रेसाठी आलेल्या दोन भाविकांचा मृत्यू | पुढारी

कोल्हापूर : जोतिबा यात्रेसाठी आलेल्या दोन भाविकांचा मृत्यू

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  जोतिबा यात्रेसाठी आलेल्या दोन भाविकांचा वेगवेगळ्या घटनेत मृत्यू झाला. प्रमोद धनाजी सावंत (वय 20, रा. भिकवडी खुर्द, ता. कडेगाव, जिल्हा सांगली) या तरुणाचा कड्यावरून दरीत कोसळून मृत्यू झाला. बुधवारी पहाटे पावणेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, मुंबईच्या संजय शिंदे (वय 59) यांचा सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव— झटक्याने मृत्यू झाला.

भिकवडी खुर्द (ता.कडेगाव, जि. सांगली) येथील 50 ते 60 भाविक जाोतिबा दर्शनासाठी आले होते. दुपारी दोन वाजता ते गावाहून निघाले होते. सायंकाळी सासनकाठीसह ते जोतिबा यात्रेत सहभागी झाले होते. धार्मिक विधी व जेवण आटोपून रात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास ते झोपी गेले. पहाटेच्या सुमारास यापैकी प्रमोद सावंतसह अन्य दोघेजण प्रातःर्विधीसाठी अंधारात बाहेर पडले. डोंगराच्या दक्षिण बाजूला ते गेले होते. यावेळी प्रमोद सावंत हा उंच कड्यावरून खाली कोसळला. हे पाहून तेथे उपस्थितांनी आरडाओरडा केला. परंतु, प्रमोद हा 40 ते 50 फूट खोल दरीत कोसळला. त्याला गंभीर अवस्थेत उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.

दोनच दिवसांपूर्वी त्याचा वाढदिवस झाला होता. प्रमोद हा महाविद्यालयीन शिक्षण घेत शेती करत होता. त्याच्या या अपघाती मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या मागे आई-वडील,भाऊ, दोन बहिणी असा मोठा परिवार आहे. दरम्यान, सकाळी अकराच्या सुमारास मुंबईच्या संजय शिंदे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. शिंदे परिवारासह दर्शनासाठी आले होते. सकाळी त्यांना चक्कर आल्याने यात्रेच्या ठिकाणी प्राथमिक उपचार केले. त्यानंतर सीपीआरमध्ये दाखल केले असता उपचार सुुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. ते मंत्रालयात नोकरीस होते. नुकतेच त्यांनी सेवानिवृत्ती घेतली होती.

मंदिराजवळ मुख्य कमानीचे दगड निखळल्याने दोघे जखमी

जोतिबा यात्रेच्या मुख्य सोहळ्यावेळी सासनकाठी कमानीला लागल्यामुळे कमानीतील दगड निखळून दोन भाविकांच्या डोक्यामध्ये पडला. यामध्ये सुरज हणमंत उदाळे (27) व अथर्व विजय मोहिते (दोघे,रा. बहे- बोरगाव,ता. वाळवा) हे जखमी झाले आहे. त्यांच्या डोक्याला इजा झाली आहे. यापैकी एकावर खासगी तर दुसर्‍यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत.

Back to top button