कोल्हापूर: राजाराम बंधारा येथे पंचगंगा नदीत दोन मुले बुडाली | पुढारी

कोल्हापूर: राजाराम बंधारा येथे पंचगंगा नदीत दोन मुले बुडाली

कसबा बावडा : पुढारी वृत्तसेवा :  राजाराम बंधारा येथे आज (दि.५) दुपारी पंचगंगा नदी पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांपैकी लाईन बाजार येथील माहीर इम्रान पठाण (वय १०) बुडाला. तर त्याच्यासोबत असलेला आंबेडकर नगर कसबा बावडा येथील मानव गणेश कांबळे (वय १२) याला वाचवण्यात यश आले. त्याला सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, शाळकरी मुले दुपारी साडेबारा पावणे एकच्या सुमारास पंचगंगा नदीपात्रात पोहण्यासाठी आली. माहीर व मानव या दोन मित्रांनी राजाराम बंधाऱ्याच्या उत्तरेला नदीपात्रात उडी घेतली. पोहता येत नसल्याने पाण्यात बुडू लागल्यानंतर दोघांनीही आरडा ओरड सुरु केली. दरम्यान याची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. अनिशमन दलाचे जवान गाडीसह तत्काळ राजाराम बंधारा येथे दाखल झाले. याच दरम्यान बावडा रेस्क्यू फोर्सचे जवानही दाखल झाले. दोन मुले बुडाल्याची माहिती मिळाल्यामुळे शोध मोहिमेसाठी बोटही मागविण्यात आली.

मुलांचा आरडाओरडा ऐकून मासे पकडत असणाऱ्या तरुणाने नदीपात्रात उडी घेतली. मानव गणेश कांबळे (रा. आंबेडकर नगर, कसबा बावडा) याला पाण्यातून बाहेर काढण्यात आले. पण नाका तोंडातून पाणी गेल्यामुळे तो बोलत नव्हता. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला तात्काळ सीपीआर रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले. त्याची प्रकृती सुधारत असल्याचे समजते.

पाण्यात बुडालेल्या माहीर इम्रान पठाण (रा. पीर गल्ली, लाईन बाजार) याचा शोध अग्निशमन दलाच्या जवानाबरोबर बावडा रेस्क्यू फोर्सचे जवानही घेत होते. मुले नदीपात्रात बुडाल्याची माहिती सोशल मीडियामुळे वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली आणि संबंधित तसेच मुलांच्या राजाराम बंधाऱ्याकडे धाव घेतली. दुपारी सव्वादोन च्या सुमारास कसबा बावडा बावडा रेस्क्यू फोर्स चे जवान नितीन माने, राहुल भोजने व संग्राम जाधव यांनी माहीर याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. मृतदेह पुढे सीपीआरमध्ये उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. माहेर याच्या पश्चात लाईन बाजार येथे भाऊ आणि आई आहे.

हेही वाचा 

Back to top button