

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेत कनिष्ठ अभियंता नसल्याने भरतीसाठी जाहिरात काढली. 9 जागांसाठी तब्बल 600 उमेदवारांनी अर्ज केले. परंतु, प्रशासनाला संबंधितांच्या मुलाखती घ्यायला वेळच नसल्याचे चित्र आहे. भरती प्रक्रियेची फाईल अक्षरशः आठ महिने धूळखात पडून आहे. बेरोजगार असलेले अनेक अभियंता नोकरीच्या आशेवर डोळे लावून बसले आहेत. संबंधितांनी अधिकर्यांकडे चौकशी केली असता अद्याप काही अपडेटस् नाहीत, एवढेच उत्तर त्यांना मिळत आहे.
प्रशासनाने ठोक मानधन तत्त्वावर अभियंता भरतीसाठी 8 जून 2022 रोजी जाहीरात प्रसिद्ध केली होती. सिव्हिल डिप्लोमा अशी शैक्षणिक पात्रता आणि 20 हजार रु. ठोक मानधन आहे. 16 सप्टेंबर 2022 ला पात्रता यादी लावण्यात आली. त्यानंतर आज ना उद्या मुलाखतीसाठी बोलवतील, या आशेने उमेदवार तयारी करत होते. मात्र, अद्याप भरतीची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. महापालिकेत तांत्रिक स्टाफ कमी आहे. त्यामुळे लवकरात लवकर भरती झाल्यास स्टाफ मिळून इतर अधिकार्यांवरील कामाचा ताण कमी होणार आहे.