

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : कसबा बावडा येथील श्री छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून यासाठी उमेदवारांकडून सर्व मार्गांचा अवलंब करण्यात येत आहे. यासंदर्भात गोकुळमध्येही कर्मचार्यांच्या बैठका सुरू आहेत. दूध संकलन वाढीच्या नावाखाली राजाराम साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील गावातील कर्मचार्यांच्या बैठका सुरू आहेत. सोमवारी दुपारी दोन तालुक्यातील कर्मचार्यांची बैठक ताराबाई पार्क येथील कार्यालयात बोलाविली होती. याची माहिती गोकुळच्या संचालक शौमिका महाडिक यांना समजल्यानंतर त्या दुपारी थेट गोकुळच्या कार्यालयात आल्या. महाडिक यांच्या अचानक झालेल्या या एंट्रीमुळे चर्चेची दिशाच बदलल्याचे समजते.
निवडणुकीसाठी सहकारी संस्थांमधील कर्मचार्यांची प्रचारासाठी मदत घेतली जाते. हे काही नवीन नाही. पुर्वीपासून चालत आलेले आहे. ज्याची सत्ता असते ती मंडळी सहकारी संस्थांमधील कर्मचार्यांना प्रचारामध्ये गुंतवत असते. सध्या राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आ. सतेज पाटील व माजी आ. महादेवराव महाडिक यांच्यात टोकाचा संघर्ष आहे. या निवडणुकीत आ. पाटील यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. जिल्ह्यातील सहकारी संस्थांमध्ये महाडिक यांच्याकडे सध्या राजाराम कारखाना एकमेक सत्ताकेंद्र आहे. त्याला देखील सुरूंग लावण्यासाठी आ. पाटील यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. एका एका मतासाठी त्यांनी पायाला भिंगरी बांधली असली तरी तेवढीच यंत्रणा महाडिक गटाने देखील लावली आहे. त्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
राजाराम सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र प्रामुख्याने करवीर, शाहूवाडी, पन्हाळा, हातकणंगले तालुके असून त्यामध्ये 122 गावांचा समावेश आहे. या कार्यक्षेत्रात राहणार्या गोकुळच्या कर्मचार्यांच्या बैठका सुरू आहेत. शनिवारी दोन तालुक्यातील कर्मचार्यांची बैठक झाली. आज दोन तालुक्यातील कर्मचार्यांची बैठक ताराबाई पार्क येथील कार्यालयात दुपारी बोलाविण्यात आली होती. गोकुळमध्ये राजाराम कारखान्या संदर्भात प्रचारासाठी बैठका सुरू असल्याची माहिती संचालक शौमिका महाडिक यांना समजल्यानंतर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात आल्या. तळ मजल्यावरील हॉलमध्ये कर्मचारी बसले होते. यावेळी कार्यालयात गोकुळचे अध्यक्ष विर्श्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगुले आदी उपस्थित होते.