हसन मुश्रीफ यांच्याविरुद्ध आणखी 67 तक्रारी दाखल | पुढारी

हसन मुश्रीफ यांच्याविरुद्ध आणखी 67 तक्रारी दाखल

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना शेअर्स फसवणूकप्रकरणी आमदार हसन मुश्रीफ यांच्याविरोधात आणखी 67 शेतकर्‍यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यामुळे तक्रारदारांची एकूण संख्या 108 वर पोहोचली आहे.

साखर कारखान्याचे सभासद करतो, असे सांगून मुश्रीफ यांच्यासह संचालकांनी प्रत्येकी दहा हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार मुरगूड पोलिस ठाण्यात दाखल केली होती. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषणकडे सोपविण्यात आला आहे.

67 शेतकर्‍यांनी आर्थिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस उपअधीक्षक श्रीकांत पिंगळे यांची भेट घेऊन या तक्रारी दाखल केल्या आहेत. या फसवणूकप्रकरणी आमचे जबाब नोंदवून घ्या, अशी मागणी त्यांनी केली आहे. तक्रारदार शेतकर्‍यांचे जबाब घेऊन चौकशीची प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचे पिंगळे यांनी सांगितले.

Back to top button