जोतिबा दर्शन रांग नव्या मंडपातून; १४५ सीसीटीव्ही कॅमेरे, यात्रेवर ड्रोनची नजर | पुढारी

जोतिबा दर्शन रांग नव्या मंडपातून; १४५ सीसीटीव्ही कॅमेरे, यात्रेवर ड्रोनची नजर

जोतिबा डोंगर/ कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : दख्खनचा राजा जोतिबाच्या चैत्र यात्रेसाठी जोतिबा डोंगरावर जोरदार तयारी करण्यात आली आहे. नव्याने उभारण्यात आलेल्या दर्शन मंडपातून यंदा प्रथमच भाविकांना दर्शनासाठी सोडले जाणार आहे. रामलिंग मंदिर ते शिवाजी चौक येथे तात्पुरत्या स्वरूपाचा बि—ज उभारण्यात येणार असून मंदिरातील गर्दीवर नियंत्रणासाठी याची मदत होणार आहे. यासह अग्निशमन यंत्रणा, सीसीटीव्ही कॅमेरे, प्रकाश योजना, जनरेटर सेट ही यंत्रणाही सज्ज करण्यात आली आहे.

चैत्र यात्रेसाठी येणार्‍या भाविकांना दर्शन मंडपातून दर्शनासाठी सोडण्यात येणार आहे. इमारतीचा तळ मजला, पहिला मजला व दुसरा मजला भाविकांच्या रांगेकरिता वापरण्यात येणार आहे. तिथून पालखी सदरेमागून रामलिंग मंदिर येथे उभारण्यात येणार्‍या सिंधिया देवस्थान ट्रस्ट मंडपात येईल. पुढे नंदी मंदिरासमोरून मुख्य मंदिरामध्ये प्रवेश देण्यात येईल.

पोलिसांच्या मदतीला 100 स्वयंसेवक

पोलिस प्रशासनाकडून बंदोबस्त असणार आहे. त्यांच्या मदतीला 100 स्वयंसेवक गार्डदेखील उपलब्ध करून घेण्यात येणार आहेत. याव्यतिरिक्त इतर स्वयंसेवी संस्थांचे सदस्यही मदतीला असणार आहेत.

यात्रेवर ड्रोनची नजर

यात्रेतील गर्दीवर नियंत्रणासाठी देवस्थान समितीच्या वतीने ड्रोनची व्यवस्था करण्यात आली आहे. यासह सीसीटीव्ही मंदिर परिसरामध्ये 28 कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यासह यात्रा मार्ग, पार्किंग अशा ठिकाणी मिळून 145 कॅमेरे लावण्यात आले आहेत. याचे नियंत्रण आपत्ती व्यवस्थापन कक्षातून केले जाईल.

वॉकीटॉकी यंत्रणा

यात्रा काळात मोबाईल रेंजवर मोठा ताण आल्याने संपर्क होऊ शकत नाही. यात्रेत कोणाची चुकामूक झाल्यास त्याच्या मदतीसाठी लाऊड स्पीकरवरून माहिती दिली जाईल. यासह प्रशासकीय यंत्रणेचा संपर्क राहावा, यासाठी 30 वॉकीटॉकी देवस्थान समितीकडून उपलब्ध करून देण्याते येणार आहेत.

14 फायर एस्टिंगविशर्स

अग्निशामक यंत्रणेमार्फत 14 फायर एस्टिंगविशर्स उभारण्यात आली आहेत. ही जोतिबा मंदिर, चोपडाई मंदिर, महादेव मंदिर, यमाई मंदिर, नावजी मंदिर अशा ठिकाणी असणार आहेत. तसेच यात्रा काळात वीजपुरवठा खंडित झाल्यास दोन जनरेटरची व्यवस्था असणार आहे.

प्राथमिक आरोग्य सेवा

हत्ती महल ओवरीमध्ये, सेंट्रल प्लाझा येथे व्हाईट आर्मीचा सर्व सोयींनी युक्त दवाखाना असणार आहे. देवस्थान समिती तसेच स्वयंसेवी संस्थांच्या रुग्णवाहिकाही तैनात राहणार आहेत.

Back to top button