राजाराम कारखाना निवडणूक : विरोधकांनी पुराव्यादाखल सादर केली 1 लाख 30 हजार कागदपत्रे | पुढारी

राजाराम कारखाना निवडणूक : विरोधकांनी पुराव्यादाखल सादर केली 1 लाख 30 हजार कागदपत्रे

कसबा बावडा, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विरोधी राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्या 29 उमेदवारांनी शुक्रवारी काँग्रेसचे नेते आ. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली अपील दाखल केले. प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्याकडे अर्ज फेटाळलेल्या उमेदवारांच्या अपिलाबरोबर तब्बल एक लाख तीस हजार कागदपत्रे पुराव्यादाखल सादर करण्यात आली.

महत्त्वाच्या निर्णयांसाठी सर्वोच्च न्यायालयही सुट्टीच्या दिवशी सुरू राहते, त्याप्रमाणे शनिवारी सुट्टी असली तरी तत्काळ सुनावणी घ्या, अशी मागणी करण्यात आली.

निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी अवैध ठरवलेल्या उमेदवारांनी प्रादेशिक सहसंचालक (साखर) अशोक गाडे यांची भेट घेतली. संबंधितांच्या वकिलांनी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी कशा पद्धतीने अर्ज अवैध ठरवले ते सांगितले. त्यांनी आपल्या निर्णयामध्ये हरकत मंजूर असे म्हटले आहे. मात्र, उमेदवारी अर्ज मंजूर किंवा नामंजूर, असा कोठेही उल्लेख नसल्याचे गाडे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

तीन दिवसांच्या आत मुदतीत अपील दाखल केले आहे. येणार्‍या दहा दिवसांत अनेक सुट्ट्या आहेत, त्यामुळे उद्याच (शनिवारी) सुनावणी घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

कारखाना पोटनियमातील तरतुदीनुसार एक दिवसात नोटिसा लागू करता येतात. आवश्यक असल्यास आम्ही आमच्या खर्चाने वर्तमानपत्रात त्याची जाहीर नोटीस देतो, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. आपण अपील दाखल करा, मी नोटिसा काढतो, अशी ग्वाही प्रादेशिक सहसंचालक (साखर) अशोक गाडे यांनी दिली.

रेकॉर्ड न तपासता निर्णय

निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी रेकॉर्ड न तपासता निर्णय दिला. अपात्र उमेदवारांना सायक्लोस्टाईल पत्र काढून केवळ नावे बदलत निकाल दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी शनिवारी सुनावणी घ्यावी आणि लवकरात लवकर निर्णय द्यावा. या निर्णयानंतर जर उच्च न्यायालयात जावे लागले, तर त्यासाठी मुदत मिळेल, असे आ. सतेज पाटील यांनी सांगितले.

ऊस दिल्याचे कारखान्याकडून पुरावे

निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी तक्रारदाराची तक्रार काय, हेही आम्हाला न सांगता निर्णय दिला. त्यांनी नोंद केलेला ऊस कारखान्याकडे संबंधितांनी पाठवला नाही, असे कारण दिले आहे. मात्र, याच कारखान्याने या उमेदवारांचा ऊस कारखान्यात आला. त्याचे पैसे संबंधित शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा होऊन त्यातून सेवा संस्थेची येणेबाकी वजा झाली, ही वस्तुस्थिती आ. सतेज पाटील यांनी कागदपत्रांसह मांडली.

संबंधित अधिकार्‍यांविरुद्ध फौजदारी

सत्तेचा गैरवापर करूनच हे अर्ज अवैध ठरवण्यात आल्याचा आरोप करून सतेज पाटील यांनी आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी व कारखान्याचे कार्यकारी संचालक यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले.

आमच्या महत्त्वाच्या 29 उमेदवारांचे अर्ज निकालात काढले आहेत. हा सत्ताधार्‍यांचा मैदानातून पळ आहे. कुस्ती लागायच्या अगोदर महाडिक कंपनी लंगोटी टाकून पळाली असल्याचे कारखान्याचे माजी अध्यक्ष सर्जेराव माने यांनी सांगितले.

‘महाडिक घाबरले…’

प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालयातून अपील दाखल केल्यानंतर बाहेर पडताना परिवर्तन आघाडीच्या समर्थकांनी ‘घाबरले… घाबरले… महाडिक घाबरले…’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

Back to top button