‘इस्रो’च्या मदतीने राज्यातील आपत्ती व्यवस्थापन | पुढारी

‘इस्रो’च्या मदतीने राज्यातील आपत्ती व्यवस्थापन

कोल्हापूर, अनिल देशमुख : राज्यातील आपत्ती व्यवस्थापन आता अवकाश तंत्रज्ञानाच्या मदतीने करण्यात येणार आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) सहकार्याने राज्य शासनाने त्याची तयारी सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील अठरा जिल्ह्यांतील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकार्‍यांना सहा दिवसांचे मूलभूत प्रशिक्षण दिले आहे. तीन महिन्यांनंतर अत्याधुनिक प्रशिक्षण दिले जाणार आहे.

बदलत्या अवकाश तंत्रज्ञानाचा वाढता वापर तसेच उपग्रहांची आपत्ती व्यवस्थापनासाठी चांगली मदत होणार आहे. राज्य शासनाने उपग्रह आधारित आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सर्वाधिक आपत्तीग्रस्त 18 जिल्ह्यांचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन संचालनालयाचे उपसचिव, मुंबई महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभागातील 8 अधिकारी आदींसह 30 जणांचे पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण झाले.

अवकाश तंत्रज्ञानाच्या वापराने जिल्ह्याचा नकाशा तयार करणे, उपग्रहांवरून तत्काळ सद्यस्थिती (रिअल टाईम लाईव्ह पिक्चर) उपलब्ध करणे, त्याद्वारे आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रत्येक गाव, शहराचा गुगल नकाशा, त्यामध्ये सर्व रस्ते, सर्व शासकीय कार्यालये, रुग्णालयांसह संबंधित गाव-शहराची सर्व माहिती उपलब्ध करून एका क्लिकद्वारे आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याची माहिती देण्यात आली.

उपग्रहांचे काम, त्यांचे प्रकार कोणते, त्यांची फिरण्याची कक्षा त्याद्वारे माहितीची देवाण-घेवाण करणे, माहिती संकलित करणे याचे प्रशिक्षण देण्यात आले. काही उपग्रहांचे प्रत्यक्ष कामही दाखवण्यात आले.

वेगवेगळ्या देशांनी विविध कारणांसाठी सोडलेले उपग्रह, त्यांची होणारी मदत याचेही प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. अवकाश तंत्रज्ञानाशी संबंधित वापर करता येणारी तसेच मोफत व सहजपणे उपलब्ध होणारी विविध सॉफ्टवेअर्स, त्यांचा वापर याची माहिती देण्यात आली. या प्रशिक्षणाच्या आधारे आता आराखडा तयार करण्यात येणार आहे.

आपत्ती व्यवस्थापनासाठी स्वतंत्र उपग्रह शक्य

आपत्ती व्यवस्थापनासाठी अवकाश तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाल्यानंतर राज्य शासनाकडून केवळ आपत्ती व्यवस्थापनासाठी उपयोगात येणारा स्वतंत्र उपग्रहही सोडला जाण्याची शक्यता आहे.

‘इस्रो’चे राज्य शासनाला सहकार्य

या उपक्रमासाठी ‘इस्रो’ आवश्यक ती सर्व तांत्रिक मदत, प्रशिक्षण देत आहे. ‘इस्रो’च्या वतीने पिल्लई अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कार्तिक नारायणन यासाठी समन्वयक म्हणून काम पाहत आहेत.

Back to top button