कोल्हापूर : जोतिबा यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात

कोल्हापूर : जोतिबा यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : दख्खनचा राजा जोतिबाची चैत्र यात्रा यंदा मोठ्या उत्साहात व पूर्ण क्षमतेने होण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने सर्व तयारी केली आहे. 5 एप्रिलला होणार्‍या मुख्य यात्रेसाठी जोतिबा डोंगरावर प्रशस्त पार्किंग, सासनकाठ्यांचा मार्ग, एस. टी. बससेवा, अन्नछत्र, वैद्यकीय सुविधा यांची तयारी अंतिम टप्प्यात आहे. मानाच्या सासनकाठ्या शनिवारपासून दाखल होत असून जोतिबा डोंगरावरही कामदा एकादशीपासून धार्मिंक विधींना सुरुवात होणार आहे. शनिवारी (दि. 1) कामदा एकादशीपासून जोतिबाचा पालखी सोहळा सुरू होतो. हा सोहळा पंधरा दिवस चालतो. चैत्र पौर्णिमेची मुख्य यात्रा 5 एप्रिल रोजी भरणार आहे. बेळगावहून आलेली मानाची सासनकाठी शुक्रवारी पंचगंगा नदी घाटावर दाखल झाली. यासोबतच मानाच्या सासनकाठ्याही शनिवारपासून दाखल होण्यास सुरुवात होणार आहे.

प्रशस्त पार्किंग व्यवस्था

दुचाकी, चारचाकीची जोतिबा डोंगरावर गर्दी टाळण्यासाठी पार्किंगसाठी 22 ठिकाणे उपलब्ध करण्यात आली आहे. घाटातील आंब्याच्या झाडानजीक पार्किंग उपलब्ध राहणार आहे. डोंगरावरील जुने एस.टी. स्टॅन्ड परिसर, गिरोली घाटाकडून येणार्‍यांना यमाई मंदिर परिसरात पार्किंग उपलब्ध करून दिले जाते. सेंट्रल प्लाझा, जुने एस.टी. स्टॅन्ड, एमटीडीसी परिसर, तळे, तोरणाई कडा, जुने आंब्याचे झाड, ग्रामपंचायत पार्किंग, यमाई मंदिर परिसर, बुने कॉर्नर, निलगिरी बाग, दानेवाडी फाटा परिसरात 22 ठिकाणी पार्किंग उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मोफत बसची सुविधा

डोंगरावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी डोंगर पायथ्याला पार्किंगची सुविधा आहे. केर्लीकडून येणार्‍या वाहनांना घाटातील जुन्या आंब्याच्या झाडाजवळ प्रवेश बंद करण्यात येणार आहे. येथे त्यांची वाहने पार्किंगमध्ये ठेवून तिथून बसने डोंगरावर सोडले जाईल. गिरोलीकडून येणार्‍या वाहनांना घाटातील श्रावणी हॉटेलपासून देवस्थान समितीच्या वतीने मोफत बससेवा दिली जाणार आहे. तसेच झंवर ग्रुपच्या वतीने यात्रा काळात सकाळी 7 ते सायंकाळी 7 यावेळेत पंचगंगा नदी ते जोतिबा डोंगर मार्गावर मोफत बसेसची सेवा दिली जाणार आहे.

सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची नजर

मंदिर परिसरात भाविकांच्या सुरक्षिततेसोबत गर्दीवर नियंत्रणासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. मंदिरासमोरील सिंधीया ट्रस्टच्या जागेत स्वतंत्र नियंत्रण कक्षही सुरू करण्यात येणार आहे. यात्रा काळात 145 कॅमेरे नव्याने लावले जाणार आहेत.

घाटात वाहने थांबवू नका…

3 ते 5 एप्रिलदरम्यान जोतिबा डोंगर परिसरात रस्त्याच्या दुतर्फा वाहने पार्किंग करण्यास मनाई करण्यात आली आहे. पोलिस प्रशासनाने पार्किंगसाठी उपलब्ध केलेल्या जागीच भाविकांनी वाहने उभी करावीत. जुने आंब्याचे झाड, (दानेवाडी क्रॉसिंग) ते जुने एस.टी. बसस्थानक, मेन पार्किंग-यमाई पार्किंग ते गिरोली फाटा, दानेवाडी फाटा ते दानेवाडी क्रॉसिंगदरम्यानच्या मार्गावर सर्व प्रकारच्या मोटार वाहनांना रस्त्याच्या दोन्ही बाजूस थांबण्यास व पार्किंग करण्यास मनाई करण्यात आली आहे.

24 तास वैद्यकीय सुविधा

जीवन मुक्ती सेवा संस्था व्हाईट आर्मीच्या वतीने चैत्र जोतिबा यात्रेनिमित्त 24 तास वैद्यकीय सेवा देणारे सुसज्ज हॉस्पिटल तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात येणार आहे. प्रशासनाच्या मदतीसाठी 3 ते 7 एप्रिल या कालावधीत जोतिबा डोंगरावर वैद्यकीय सुविधा, रुग्णवाहिका, हिरकणी कक्ष, विश्रांती कक्ष याची व्यवस्था करणार आली आहे. शंभर डॉक्टरांचा सहभाग व 6 बेडच्या या हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार दिले जातील.

मोफत अन्नछत्र

सहज सेवा ट्रस्टच्या वतीने गायमुख परिसर, आर. के. मेहता ट्रस्टच्या वतीने जिल्हा परिषद जुने विश्रांती कक्ष, शिवाजी चौक मित्र मंडळातर्फे पंचगंगा नदी परिसरात मोफत अन्नछत्र उभारण्यात येणार आहे. 2 एप्रिल ते 6 एप्रिल या कालावधीत ही अन्नछत्रे सुरू राहणार आहेत.

पालखी मार्गावरील अतिक्रमणे बंदोबस्तात हटवली

दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची चैत्र यात्रा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. याची प्रशासनाकडून युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. देवस्थान समिती, ग्रामपंचायत, महावितरण, पोलिस प्रशासन, आरोग्य विभाग यांच्याकडून तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. भाविकांना सुसज्ज अशी ठिकठिकाणी पार्किंगची सुविधा केली आहे. आज प्रशासनाच्या वतीने तहसीलदार रमेश शेंडगे व नायब तहसीलदार कौलवकर यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत व देवस्थान समितीच्या कर्मचार्‍यांनी चैत्र यात्रेचा मुख्य मानला जाणारा पालखी सोहळा मार्गावरील अतिक्रमण काढण्यात आली. याचबरोबर स्वच्छता, दर्शन रांगेचा आढावा घेण्यात आला. जोतिबा चैत्र यात्रेसाठी प्रशासन सज्ज असल्याचे पाहावयास मिळत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news