जोतिबा देवाचं याड लागलं बेळगावकरांना..! | पुढारी

जोतिबा देवाचं याड लागलं बेळगावकरांना..!

कोल्हापूर, गौरव डोंगरे : सजलेल्या बैलगाड्या… दीड-दोनशे भक्तांचा गोतावळा… 140 किलोमीटरचा पायी प्रवास… मुक्कामी जोतिबाची आरती व महाप्रसाद… ही परंपरा मागील दोनशे वर्षांहून अधिककाळ बेळगावकरांनी जपली आहे. जोतिबाचे परमभक्त बेळगाव गिराप्पा धुराजी यांच्यापासून सुरू झालेली सासनकाठीची ही परंपरा पुढे सार्वजनिक स्वरूपात साजरी होऊ लागली. बेळगावचे हे जोतिबा भक्त हा पायी प्रवास करून जोतिबाच्या चैत्री यात्रेत सहभागी होतात.

दख्खनचा राजा जोतिबाची सेवा करता यावी यासाठी बेळगावकर वर्षभर चैत्री यात्रेकडे डोळे लावून बसलेले असतात. जोतिबांचे भक्त ईराप्पा धुराजी यांच्यापासून ही सासनकाठी सुरू झाल्याचे मानले जाते. यानंतर या घराण्याची परंपरा सार्वजनिक झाली. 10 ते 15 बैलगाड्यांतून दीडशेहून अधिक भाविक पायी जोतिबा डोंगराकडे रवाना होतात. सहा दिवस हा प्रवास सुरू असतो.

140 किलोमीटरचा पायी प्रवास

बेळगावहून येणार्‍या बैलगाड्या पहिला मुक्काम संकेश्वर, दुसरा सौंदलगा, तिसरा गोकुळ शिरगाव, तर चौथा वडणगे असा चार दिवसांचा मुक्काम करतात. कामदा एकादशीला दक्षिण दरवाजातून पहिला प्रवेश करणारी ही सासनकाठी मंदिरात येते. 140 किलोमीटरवरून लवाजम्यासह येणारी एकमेव सासनकाठी समजली जाते.

पालखी सोहळ्यात सहभाग

कामदा एकादशीपासून दररोज जोतिबाची पालखी निघते. बेळगावची ही सासनकाठी दररोजच्या या छबिन्यामध्ये सहभागी होऊन पुन्हा जोतिबा डोंगरावरील त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी परत जाते.

2014 मध्ये दोनशे वर्षे पूर्ण

बेळगावहून येणार्‍या सासनकाठीची नोंद संस्थानकालीन, बि—टिश दफ्तरीही असल्याचे प्रा. आनंद आपटेकर यांनी सांगितले. याबाबतची कागदपत्रे, ताम्रपटही बेळगावकरांकडे असल्याचे ते सांगतात.

बेळगावकरांसाठी अन्नछत्र

कर्नाटकातून येणार्‍या भाविकांसाठी या भाविकांच्या वतीने अन्नछत्र चालवले जाते. राजर्षी शाहू महाराजांनी बक्षीसपत्र म्हणून या बेळगावच्या भाविकांना जागा दिल्याचे प्रा. आपटेकर यांनी सांगितले. या जागेला बेळगावकरी तळे अशी ओळख आहे.

बेळगावहून 27 मार्चला निघालेला 12 बैलगाड्या व 150 भाविकांचा लवाजमा पायी गुरुवारी कोल्हापूर जिल्ह्यात दाखल झाला. गोकुळ शिरगाव येथे त्यांचा रात्रीचा मुक्काम आहे. याचे नियोजन लक्ष्मण किल्लेकर, नागेंद्र नाईक, प्रभाकर शहापूरकर, नामदेव नाईक, जोतिबा किल्लेकर करीत आहेत.

Back to top button