अंबाबाई भक्तांसाठी आरोग्य केंद्राची आवश्यकता | पुढारी

अंबाबाई भक्तांसाठी आरोग्य केंद्राची आवश्यकता

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  अंबाबाई देवीच्या दर्शनाला देशभरातून प्रतिवर्षी लाखो भाविक येतात. दक्षिण भारत यात्रा करून आलेल्या अहमदनगरच्या वयस्कर भाविकाचा बुधवारी अंबाबाई मंदिर परिसरात हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. उन्हाचा तडाखा वाढत असून वृद्ध भाविक, महिलांना भोवळ येण्याचे प्रमाणही वाढले आहे. अशावेळी मंदिर परिसरात एक सर्वसोयींनी युक्त असे आरोग्य केंद्र असणे गरजेचे आहे. प्रशासनाने जुना राजवाडा परिसरातील पागा बिल्डिंग भक्तांच्या सुविधांसाठी उपलब्ध केली आहे. या ठिकाणीच हे आरोग्य केंद्र उभारल्यास हाकेच्या अंतरावर उपचार घेणे शक्य होणार आहे.

दर्शनाला येणार्‍या भक्तांमध्ये वृद्धांचे प्रमाणही मोठे असते. दर्शन रांगेमध्ये भोवळ येणे, उन्हाचा त्रास होऊन अशक्तपणा यासह काही व्याधी असणार्‍या भक्तांना आरोग्य सुविधेची तातडीने गरज भासते. अशा भक्तांना तातडीने आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. यासाठी एक रुग्णवाहिकाही मंदिर परिसरात 24 तास उपलब्ध करण्यात आली आहे.
बुधवारी घडलेल्या घटनेवेळी देवस्थानच्या वतीने तातडीची मदतही भाविकाला देण्यात आली. त्यांना उपचारासाठी तातडीने शासकीय इस्पितळात नेण्यात आले. मात्र, त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. अशा घटनांवेळी तत्काळ उपचार मिळावेत, यासाठी मंदिरापासून जवळच आरोग्य सुविधा उपलब्ध केल्यास सोयीचे ठरणार आहे.

उन्हाचा तडाखा वाढतोय

मार्च महिन्यातच पारा 35 ते 36 अंशांवर पोहोचला आहे. काही दिवसांतच परीक्षांचा कालावधी संपल्यानंतर भाविकांची गर्दी वाढते. उन्हाळी सुट्टी येणार्‍या भाविकांना येथे आरोग्य सुविधा उपलब्ध करावी लागणार आहे. वृद्ध भाविकांसाठी तातडीने येथे वैद्यकीय सुविधा व विश्रांती कक्षही उभारल्यास मोठा आधार मिळणार
आहे.

नवरात्रौत्सवात वैद्यकीय पथक

नवरात्रौत्सव काळात मंदिरात वैद्यकीय पथक तैनात केले जाते. डॉक्टरांसह आवश्यक स्टाफ येथे उपलब्ध असतो. परंतु, वर्षभर अशी सुविधा भाविकांना मिळावी, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

Back to top button