राजाराम कारखाना निवडणूक : कुस्ती लढायची असेल, तर मर्दासारखी लढा, बावड्याचा पाटील मागे पडणार नाही : सतेज पाटील (Video) | पुढारी

राजाराम कारखाना निवडणूक : कुस्ती लढायची असेल, तर मर्दासारखी लढा, बावड्याचा पाटील मागे पडणार नाही : सतेज पाटील (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : तुम्ही रडीचा डाव खेळला आहात, हिंमत असेल, तर महाडिकांच्या घरातील सगळ्यांनी उमेदवारी मागे घ्यावी. आता लढाई सरळ होऊ दे, सभासद न्याय देऊ देत आणि निर्णय घेऊ देत, तुम्हाला धूळ चारल्याशिवाय राहणार नाही. राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत मी १४ तास राबणार होतो. आता मी २४ तास राबणार आहे. कुस्ती लढायची असेल, तर मर्दासारखी लढा, बावड्याचा पाटील कधी मागे पडणार नाही, असे आव्हान माजी मंत्री सतेज पाटील यांनी आज (दि.२९) दिले.

श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये पोटनियमातील तरतुदीनुसार सत्ताधारी गटाकडून हरकती घेण्यात आल्या. यावेळी विरोधी गटातील २९ उमेदवार अपात्र ठरले आहेत. दरम्यान, सतेज पाटील यांनी अजिंक्यतारा कार्यालयात आज कार्यकर्ते आणि सभासदांच्या मेळाव्यात बोलताना माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

पाटील पुढे म्हणाले की, आजपर्यंत मी स्वत:साठी कधी लढा दिला नाही. मी गोकुळमध्ये संचालक झालो नाही. परंतु, महाडिकांनी गोकुळमध्ये स्वत:च्या कुटुंबातील माणसे घेतली. आता माघारीला दोन दिवस बाकी आहेत. महाडिकांच्या घरातील सगळ्यांनी उमेदवारी मागे घ्यावी. आता लढाई सरळ होऊ दे, सभासद न्याय देऊ देत आणि निर्णय घेऊ देत. कारखान्याचे २१ संचालक कोण असतील, याचा निर्णय १२ हजार सभासदांना घेऊ दे, असे पाटील म्हणाले. कुस्ती लढायची असेल, तर मर्दासारखी लढा, बावड्याचा पाटील कधी मागे पडणार नाही. मी १४ तास राबणार आहे, आता २४ तास राबणार असल्याचा निर्धार पाटील यांनी बोलून दाखवला.

दरम्यान, छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये पोटनियमातील तरतुदीनुसार सत्ताधारी गटाकडून हरकती घेण्यात आलेल्या विरोधी गटातील २९ उमेदवार अपात्र ठरले आहेत. आमदार सतेज पाटील गटाला हा मोठा धक्का समजला जात आहे.

श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये माजी चेअरमन सर्जेराव माने, बाजीराव पाटील, उत्तम चव्हाण यांच्यासह विरोधी गटाच्या २९ उमेदवारांवर सत्ताधारी गटाकडून तर तानाजी कृष्णा पाटील या सत्ताधारी गटाच्या उमेदवारावर विरोधी गटाकडून हरकत घेण्यात आली होती. तसेच इतर तीन उमेदवारांबाबतही हरकत नोंदविण्यात आली होती. सत्ताधारी आणि विरोधी गटाच्या वकिलांकडून हरकतींवर मंगळवारी जोरदार युक्तिवाद करण्यात आला होता. २३७ उमेदवारी अर्जांपैकी १० अपात्र ठरले होते. ३३ उमेदवारांच्या हरकतीवर रात्री उशिरा निर्णय घेण्यात आला. आज अंतिम पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाली. यामध्ये पोटनियमातील तरतुदीनुसार एकुण २९ उमेदवार अपात्र ठरले आहेत.

हेही वाचा 

कोल्हापूर जिल्हा बँकेच्या तीन माजी संचालकांची ‘ईडी’कडून चौकशी सुरू

राजाराम कारखाना निवडणूक : विरोधी गटाचे २९ उमेदवार अपात्र; सतेज पाटील गटाला मोठा धक्का

राजाराम कारखाना निवडणूक : कारखाना सभासदांच्या मालकीचा होण्यासाठी लढा : सतेज पाटील

Back to top button