राजाराम कारखाना निवडणूक : विरोधी गटाचे २९ उमेदवार अपात्र; सतेज पाटील गटाला मोठा धक्का | पुढारी

राजाराम कारखाना निवडणूक : विरोधी गटाचे २९ उमेदवार अपात्र; सतेज पाटील गटाला मोठा धक्का

कसबा बावडा, पुढारी वृत्तसेवा : श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये पोटनियमातील तरतुदीनुसार सत्ताधारी गटाकडून हरकती घेण्यात आलेल्या विरोधी गटातील 29 उमेदवार अपात्र ठरले आहेत. आमदार सतेज पाटील गटाला हा मोठा धक्का समजला जात आहे.

श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये माजी चेअरमन सर्जेराव माने, बाजीराव पाटील, उत्तम चव्हाण यांच्यासह विरोधी गटाच्या 29 उमेदवारांवर सत्ताधारी गटाकडून तर तानाजी कृष्णा पाटील या सत्ताधारी गटाच्या उमेदवारावर विरोधी गटाकडून हरकत घेण्यात आली होती. तसेच इतर तीन उमेदवारांबाबतही हरकत नोंदविण्यात आली होती. सत्ताधारी आणि विरोधी गटाच्या वकिलांकडून हरकतींवर मंगळवारी जोरदार युक्तिवाद करण्यात आला होता. 237 उमेदवारी अर्जांपैकी 10 अपात्र ठरले होते. 33 उमेदवारांच्या हरकतीवर रात्री उशिरा निर्णय घेण्यात आला. आज अंतिम पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाली. यामध्ये पोटनियमातील तरतुदीनुसार एकुण 29 उमेदवार अपात्र ठरले आहेत.

निवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्जांची छाननी मंगळवारी सकाळी 11 वा. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये तीन टप्प्यांमध्ये झाली. छाननीच्या निमित्ताने निवडणूक कार्यालय परिसरात उमेदवार, सूचक, अनुमोदक आणि समर्थकांची मोठी गर्दी होती. दरम्यान, पोलिस बंदोबस्तही तैनात केला होता. दुपारी अडीचनंतर हरकतींवर सुनावणी सुरू झाली. कारखान्याच्या पोट पोटनियमातील तरतुदीनुसार नोंद क्षेत्रातील ऊस कारखान्याकडे पुरवठा न केल्याने कारखाना करारनाम्याचा भंग केला म्हणून सत्ताधारी गटाकडून विरोधी गटातील माजी चेअरमन सर्जेराव माने, बाजीराव पाटील, उत्तम चव्हाण यांच्यासह 29 उमेदवारांवर हरकत घेण्यात आली होती. सत्ताधारी गटाचे तानाजी पाटील यांची गोकुळ दूध संघाकडून उमराव पाटील पाणीपुरवठा संस्थेला केलेल्या कर्ज पुरवठ्याची बाकी थकीत आहे. यामध्ये पाणीपुरवठा संस्थेचे संचालक पाटील यांनी हमीपत्र दिल्यामुळे त्यांच्या अर्जावर विरोधकांनी हरकत घेतली. अपात्र ठरविलेल्या दहा उमेदवारांमध्ये नऊ उमेदवार हे ऊस उत्पादक गट क्र. 1-1, ऊस उत्पादक गट क्र. 3-1, ऊस उत्पादक गट क्र. 5-1, ऊस उत्पादक गट क्र. 6-6 तर इतर मागास प्रतिनिधी गटातील एका उमेदवाराचा समावेश आहे.

Back to top button