कोल्हापुरातील राम मंदिरांना शंभर वर्षांची परंपरा | पुढारी

कोल्हापुरातील राम मंदिरांना शंभर वर्षांची परंपरा

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : प्रभू श्रीरामांच्या कोल्हापुरातील मंदिरांना शंभर वर्षांहून अधिक वर्षांची परंपरा लाभली आहे. शहरातील एक गल्लीही प्रभू रामांच्या नावाने प्रसिद्ध आहे. शहर जिल्ह्यातील सर्वच राम मंदिरांमध्ये रामनवमीचा सोहळा उत्साहात साजरा होतो. कोल्हापुरातील याच मंदिरांचा थोडक्यात परिचय येथे घेऊया.

जयपूरवरून एक महंत हत्तीवरून प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, सीतामाता यांच्या मूर्ती घेऊन करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात आले होते. त्यांनी या मूर्ती अंबाबाई मंदिर परिसरात स्थापना करण्याची विनंती तत्कालीन छत्रपती आबासाहेब महाराजांकडे केली होती. याला मान्यता देत रामाच्या पारानजीक या मूर्तींची स्थापना करण्यात आल्याचे येथील पुजारी सुरेंद्र झुरळे सांगतात. स्थापनेनंतर हरीभट झुरळे यांच्याकडे पूजेची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यांची चौथी पिढी येथे सेवा देत आहे.

राम गल्लीत गुढ्यांची उभारणी

मंगळवार पेठेतील राम गल्लीमध्येही शंभर वर्षांपूर्वीचे राम मंदिर आहे. मंदिरात श्रीराम, लक्ष्मण, सीता यांच्यासोबत आदीमाया, गौरीशंकर असे राम पंचायतन स्थापण्यात आले आहे. प्रतिवर्षी राम गल्लीमध्ये रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. रामनवमी दिवशी दारोदारी गुढ्या उभारल्या जातात.

शंभर वर्षे पूर्ण केलेले राम मंदिर ट्रस्ट

शाहूपुरी चौथ्या गल्लीतील राम मंदिराची स्थापना 1922 ची आहे. डी. जी. शिंदे, डी. जे. सासने, वाय. बी. साळोखे, एस. एस. चव्हाण या विश्वस्त मंडळाने केली. कौलारू घरात असलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार करून 2007 साली आरसीसी इमारतीत आले. त्यावेळी संगमरवरी मूर्तीही बनवून घेण्यात आल्या.

मिरजकर तिकटीचे राम मंदिर

मिरजकर तिकटी येथेही जुन्या काळातील राम मंदिर आहे. शुक्ल गुरुजी येथे सेवा देतात. गुढीपाडव्यापासून रामनवमीचा नवरात्र सोहळा सुरू होतो. तसेच रामनवमीला येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यासोबतच कसबा बावडा येथील श्रीराम सोसायटीचे राम मंदिर, कागलचे राम मंदिर येथे रामनवमीचा सोहळा थाटात साजरा केला जातो.

Back to top button