कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा, विधानसभा निवडणुकीची मिनी रंगीत तालीम म्हणून ओळखल्या जाणार्या कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीसाठी पहिल्या दिवशी 284 उमेदवारी अर्जाची विक्री झाली; तर 8 अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये अडते व्यापारी गटातून नंदकुमार वळंजू, सेवा संस्था गटातून शशिकांत आडनाईक व सूर्यकांत पाटील या माजी संचालकांनी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी 3 एप्रिलपर्यंत मुदत आहे.
विविध कारणामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या बाजार समितींच्या निवडणुकीसाठी अखेर सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मार्केट यार्डातील शेतकरी भवनमध्ये अर्ज भरून घेण्यात येत आहेत. पाच गटातील 18 जागेसाठी ही निवडणूक होणार आहे. यामुळे गटनिहाय अर्ज भरून घेण्यात येत आहेत. त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. उमेदवाराने आपण कोणत्या गटासाठी अर्ज दाखल करणार हे अर्जावर लिहावयाचे आहे. त्यानुसार त्या अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडावयास लागतात. तरच तो अर्ज ग्राह्य मानला जात आहे. पहिल्या दिवशी अर्ज खरेदी करण्यासाठी गर्दी होती. त्यामुळे 284 अर्जाची विक्री झाली.
अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी नव्हती. दिवसभरात आठ अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये विकास संस्था गटातून 6, ग्रामपंचायत गटातून 1 व अडते-व्यापारी गटातून 1 असे अर्ज दाखल झाले आहेत.
शेतकरी उमेदवारांकडून 70 अर्ज खरेदी
ज्याच्या नावे जमीन आहे, अशा शेतकर्यांना बाजार समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येतो. पहिल्या दिवशी कार्यक्षेत्रातील 70 पेक्षा अधिक शेतकर्यांनी उमेदवारी अर्ज खरेदी केले आहेत.