

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हिटीचा सरासरी रेट दहा टक्क्यांवर असल्याने जीवनावश्यक दुकाने वगळता अन्य दुकाने बंद राहणार आहेत. तर तीन महिन्यांपासून दुकाने बंद असल्याने जिल्ह्यातील अन्य व्यापारी सोमवारपासून (दि. 12) दुकाने सुरू करण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. सर्व दुकाने सुरू करण्यावरून जिल्हा प्रशासन व व्यापार्यांमधील संघर्ष पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता आहे.
कोरोना पॉझिटिव्हिटी रेट हा दहा टक्क्यांवर असल्याने कोल्हापूर जिल्ह्यासाठी चौथ्या टप्प्याचे निर्बंध कायम आहेत. त्यामुळे शहरातील सुरू असलेली अन्य दुकानेही बंद झाली आहेत. शहरातील रेट दहाच्या आत असल्याने अनेक व्यापारी निश्चिंत होते.
सर्व दुकाने नियमित सुरू होतील, असा विश्वास होता; पण जिल्हा प्रशासनाने केवळ अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवेची दुकाने सुरू राहतील व अन्य दुकाने बंद राहतील, असे आदेश काढल्याने व्यापारीवर्ग पुन्हा संभ—मात पडला आहे.
प्रायोगिक तत्त्वावर दुकाने सुरू केल्यानंतरही कोरोना रेट कमी आला आहे. तरीही शहरातील सर्व दुकाने का सुरू केली जात नाहीत? केवळ दुकाने सुरू करा म्हणून आंदोलनच करत बसायचे का, असा सवाल व्यापार्यांनी केला आहे. महाद्वार रोड व सराफ असोसिएशनने रात्री व्यापार्यांची ऑनलाईन बैठक घेऊन सोमवारी दुकाने सुरू करण्याचा निर्धार केला आहे.
चेंबर ऑफ कॉमर्सने प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांची भेट घेऊन शहराच्या पॉझिटिव्हिटी रेटचा अहवाल स्वतंत्रपणे पाठवा, अशी मागणी केली. शहराबरोबरच जिल्ह्यातील दुकाने सुरू करा, अशी मागणीही केली आहे.
इचलकरंजी येथील व्यापार्यांनी सोमवारपासून दुकाने सुरू करणार असल्याचे सांगितले आहे. तर पन्हाळा येथील व्यापार्यांनी पर्यटन पूर्ववत सुरू करा, जेणेकरून व्यापार सुरू करण्याला चालना मिळेल, यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांना निवेदन देण्याचा निर्णय घेतला आहे.