कोल्हापूर : राज्यातील 145 कारखान्यांचा हंगाम आटोपला | पुढारी

कोल्हापूर : राज्यातील 145 कारखान्यांचा हंगाम आटोपला

कौलव; राजेंद्र दा.पाटील :  राज्यातील साखर कारखान्यांचा भाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला असून 145 कारखान्याच्या हंगामाचे सूप वाजले आहे राज्यात 1039 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप होऊन 1035 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा 9.96 टक्के एवढा आहे. ऊस गाळपात सोलापूर तर सरासरी साखर उतार्‍यात कोल्हापूर जिल्हा आघाडीवर आहे. ऊस उत्पादनातील घटीमुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा ऊस गाळपासह उतार्‍यातही घट झाली आहे.

चालू गळीत हंगामात राज्यात 106 सहकारी व 104 खासगी अशा एकूण 210 साखर कारखान्यांनी हंगाम घेतला आहे. यंदा राज्याची दैनंदिन गाळप क्षमता वाढून प्रतिदिन 8 लाख 84 हजार 950 मेट्रिक टनावर पोहोचली आहे. तसेच कारखान्यांचीही भर पडली आहे. त्यामुळे इतिहासातील उच्चांकी 1500 लाख टन ऊस गाळप होईल, असा अंदाज होता. मात्र तो फोल ठरला असून हवामानातील चढउतारामुळे यावर्षी ऊस उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्याचा फटका साखर उद्योगाला बसल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यात सरासरी साडेतीन ते पावणेचार महिन्यांचा गळीत हंगाम पूर्ण झाला आहे. 24 मार्चपर्यंत कोल्हापूर विभागातील 36 कारखान्यांनी 229.99 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून 262.69 साखर लाख क्विंटल उत्पादित केली आहे. सरासरी साखर उतारा 11.42 टक्के आहे, तर सोलापूर विभागातील 50 कारखान्यांनी 229.39 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून 205.26 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. सरासरी साखर उतारा 8.95 टक्के एवढा आहे.

कोल्हापूर जिल्ह्याने सरासरी साखर उतार्‍यात 11.61 टक्के उत्तार्‍यासह आपले अग्रस्थान कायम राखले आहे. जिल्ह्यात 1 कोटी 46 लाख 52728 मेट्रिक टन उसाचे गाळप करून 1 कोटी 70 लाख 11482 क्विंटल साखर उत्पादित केली आहे. त्या पाठोपाठ सातारा जिल्ह्याने 10.28 टक्के एवढा दुसर्‍या क्रमांकाचा उतारा मिळवला आहे. ऊस उत्पादनात सोलापूर जिल्ह्याने 1 कोटी 80 लाख 27,528 मेट्रिक टन एवढे उच्चांकी गाळप करून 1 कोटी 61 लाख 15507 क्विंटल साखर उत्पादित केली आहे. सरासरी साखर उतारा 8.94 टक्के एवढा आहे.

गतवर्षी याच दरम्यान राज्यातील 198 कारखान्यांनी 1100.28 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून 1140.76 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले होते. राज्याचा सरासरी साखर उतारा 10.37 टक्के एवढा होता. गतवर्षीच्या तुलनेत राज्यात 61 लाख टन ऊस गाळप कमी झाले असून साखर उतार्‍यातही घट झाली आहे. नागपूर विभागाने सर्वात कमी 4 लाख 78 हजार उसाचे गाळप केले असून 7.22 टक्के एवढा नीचांकी साखर उतारा आहे.

Back to top button