कोल्हापूर : पात्रता 'ड्रायफ्रूटस्'ची, मिळाले फरसाण? | पुढारी

कोल्हापूर : पात्रता 'ड्रायफ्रूटस्'ची, मिळाले फरसाण?

कोल्हापूर; राजेंद्र जोशी :  कोल्हापुरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय मंजूर करून आणल्याच्या श्रेयवादाचे फलक जागोजागी झळकू लागले आहेत. कोल्हापूरसाठी हे महाविद्यालय मंजूर करून आणण्याचे निर्विवाद श्रेय राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे जाते. परंतु, जेव्हा या महाविद्यालयाची गरज होती, तेव्हा ते मिळाले नाही आणि आता जेव्हा ‘आयआयटी’, ‘आयआयएम’ यांसारख्या संस्थांची गरज निर्माण झाली आहे. तेव्हा तुलनेने गरज आणि महत्त्व कमी झालेले अभियांत्रिकी महाविद्यालय मंजूर झाले आहे. साहजिकच कोल्हापूरकरांची अवस्था ड्रायफ्रूटस्ची पात्रता असताना फरसाण मिळावा, अशी झाली आहे.

राज्यात आणि दिल्ली दरबारी वजन असलेल्या मंत्री चंद्रकांत पाटील याच महाविद्यालयाचे रूपांतर आयआयटीसारख्या उच्च तंत्रशिक्षण देणार्‍या संस्थेमध्ये केले, तर राजर्षींनी लावलेल्या कोल्हापूरच्या शैक्षणिक परंपरेचे एक नवे पाऊल पडू शकते. कोल्हापूर जिल्ह्याचाच विचार करायचा झाला, तर आज जिल्ह्यात तब्बल 16 अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयात काही अपवाद वगळले, तर प्रतिवर्षी 40 टक्के जागा रिक्त राहात आहेत. आता शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांनाही प्रवेशाच्या शेवटच्या फेरीपर्यंत विद्यार्थी मिळत नाहीत, अशी स्थिती असताना मंत्री पाटील यांनी हे नवे महाविद्यालय आणले आहे. त्याऐवजी जर त्यांनी कोल्हापुरात शाहू मिलच्या जागेमध्ये आयआयटीसारखी संस्था उभारण्याचा हट्ट दिल्लीश्वरांपुढे धरला असता, तर शाहू मिलची जागाही योग्य कारणासाठी लागली असती आणि राजर्षींनाही ती मानवंदना ठरली असती.

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला विरोध करण्याचा हा विषय नाही. पण वस्तुस्थिती काय, याचाही साकल्याने विचार होण्याची गरज आहे. राज्याच्या तंत्रशिक्षण संचालनालयाची वेबसाईट पाहिली, तर आज कोल्हापुरातच अभियांत्रिकी शिक्षणाच्या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रथम वर्षाच्या 7 हजार 250 जागा उपलब्ध आहेत. या जागा भरताना संस्थाचालकांना घाम फुटतो आहे. प्रतिवर्षी बेरोजगार अभियंत्यांचे तांडे निर्माण होत आहेत. पोलिस भरतीत शिपायाच्या नोकरीसाठी आणि बँकांमध्ये कारकून म्हणून अर्ज करणार्‍या अभियंत्यांची संख्या मोठी आहे. यामुळेच अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने तत्कालीन अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी दर्जा खालावलेल्या आणि पटसंख्या कमी असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांना कुलूप ठोकणे भाग पाडले होते.

…तर कोल्हापूरकर विसरणार नाहीत

मंत्री चंद्रकांत पाटील कर्तबगार आहेत, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अखिल भारतीय महामंत्री म्हणून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांचे दिल्लीतही वजन मोठे आहे. त्यांच्याच प्रयत्नामुळे कोल्हापूरच्या इतिहासात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी त्यांनी पालकमंत्री असताना हट्ट धरून एकाच वेळेला 83 कोटी रुपयांचा निधी आणला होता. हीच ताकद जर आयआयटी, आयआयएम, एम्स यांसारख्या संस्थांसाठी कारणी लागली, तर कोल्हापूरकर त्यांना विसरणार नाहीत.

धारवाडमध्ये होते, मग कोल्हापूरमध्ये का नाही?

राज्याचे तंत्रशिक्षण खाते हाती आल्यानंतर 25 वर्षांच्या जुन्या मागणीला उजाळा देण्याऐवजी चंद्रकांत पाटील यांनी आयआयटी, आयआयएमसारख्या संस्थांच्या उभारणीसाठी हट्ट धरण्याची गरज आहे. कारण पंतप्रधानांनी नुकतेच कर्नाटकात धारवाडमध्ये नव्या आयआयटीचे उद्घाटन केले. शेजारी गोव्यात आयआयटी आली. पण बहुजनांच्या शिक्षणासाठी देशात सर्वप्रथम ज्यांनी दरवाजा उघडले, त्या राजर्षी शाहूंच्या जिल्ह्याला मात्र अशा राष्ट्रीय संस्थांसाठी उपेक्षा सहन करावी लागते आहे.

Back to top button