कोल्हापूर : भोगावतीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला | पुढारी

कोल्हापूर : भोगावतीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला

कौलव; पुढारी वृत्तसेवा :  शाहूनगर परिते (ता. करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. सोमवार, दि. 27 मार्चपासून संस्था सभासदांच्या प्रतिनिधीचे ठराव देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

राज्यातील अन्य सहकारी संस्थांच्या प्रमाणेच भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक कोरोनामुळे पुढे गेली होती. बिद्री येथील दूधगंगा-वेदगंगा साखर कारखान्याची ठरावांची प्रक्रिया जाहीर झाल्यामुळे भोगावतीची प्रक्रिया कधी सुरू होणार? याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष वेधले होते. आज जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी ए. व्ही. गाडे यांनी या संदर्भात नोटीस प्रसिद्ध करून संस्था गटातील ठराव नोंद करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या नोटिसीमध्ये नियम आणि अटी देखील घातल्या असून येत्या सोमवार दिनांक 27 मार्चपासून 26 एप्रिलपर्यंत ठराव जमा करण्यासाठी कळवण्यात आलेले आहे. तसेच एका संस्थेने एकच ठराव द्यावा, दुबार ठराव नोंद केल्यास संचालक मंडळावर कायदेशीर कारवाईचा इशारा देखील देण्यात आला आहे. ठराव दिलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास अगर संबंधित संस्थेची निवडणूक झाल्यास दुसर्‍यांदा सुधारित ठराव देण्याची अट घातलेली आहे.

ज्या संस्था 31/1/2020 पूर्वी कारखान्याकडे सभासद झालेल्या आहेत अशा संस्था मतदानासाठी पात्र ठरवल्या जाणार आहेत, असेही नोटीसमध्ये म्हटले आहे. भोगावती कारखान्याच्या संचालक मंडळाची एप्रिल, 2022 ला मुदत संपलेली आहे. कोरोनामुळे ही निवडणूक लांबणीवर पडलेली होती. आता संस्था ठरवायचे रूपाने निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यामुळे राजकीय हालचालींना सुरुवात होणार आहे.

Back to top button