कोल्हापूर-मुंबई विमानसेवा 5 एप्रिलपासून आठवड्यात 4 दिवस | पुढारी

कोल्हापूर-मुंबई विमानसेवा 5 एप्रिलपासून आठवड्यात 4 दिवस

उजळाईवाडी, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर-मुंबई ही स्टार एअरची विमानसेवा येत्या पाच एप्रिलपासून आठवड्यातून चार दिवस उपलब्ध होणार आहे. मंगळवार, बुधवार, गुरुवार व शनिवार अशी ही सेवा सुरू राहील, असे स्टार एअरच्या प्रशासनाने सांगितले. यापूर्वीच्या सेवेत आता एक दिवस वाढला आहे. त्यांचे 146 आसन क्षमतेचे ब्राझीलियन बनावटीचे विमान कोल्हापूर-मुंंबई विमानसेवा देण्यासाठी सज्ज आहे. ते लवकरच या सेवेत दाखल होणार आहे.

कोल्हापूर-मुंबई बंद पडलेली विमानसेवा स्टार एअरच्या वतीने 4 मार्च 2022 पासून सुरू झाली. सध्या 50 आसन क्षमतेचे विमान मंगळवार, गुरुवार व शनिवार असे आठवड्यातून तीन दिवस सेवा देत आहे. 5 एप्रिलपासून ही सेवा आठवड्यातून चार दिवस सुरू होत आहे.

मुंबई विमानतळावरून सकाळी साडेदहा वाजता विमानाचे टेकऑफ होईल. ते कोल्हापुरात साडेअकरा वाजता येईल. 11 वाजून 55 मिनिटांनी त्याचे मुंबईसाठी टेकऑफ होईल. दुपारी 12 वाजून 55 मिनिटांनी मुंबईत पोहोचेल.

स्टार एअरची 1 मार्च 2023 रोजी डीजीसीएच्या निर्देशानुसार आयएफआर चाचणी घेण्यात आली आहे. मागील काही महिने विमानाची चाचणी झाली नसल्यामुळे कमी द़ृश्यमानतेत (व्हिजिबिलिटी) मोठ्या विमानाचे लँडिंग होऊ शकत नव्हते. त्याचा फटका कंपनीला बसत होता. आता चाचणी झाल्यामुळे डीजीसीएचा ग्रीन सिग्नल मिळताच 146 आसन क्षमतेच्या विमानाची सेवा येत्या काही दिवसांतच सुरू केली जाऊ शकते. स्टार एअर प्रशासनाच्या एअर बससारख्या एमब—रर ई-195 ई-2 या प्रॉफिट हंटर विमानाची 22 नोव्हेंबर 2022 रोजी चाचणी यशस्वी झाली आहे. हे विमान येत्या काही दिवसांत स्टार एअरच्या ताब्यात येणार आहे.

सध्या विस्तारीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून, नाईट लाईटिंगचे काम पूर्ण झाले आहे. टर्मिनल बिल्डिंग, एटीसी टॉवर, 1 हजार 890 मीटरची धावपट्टी 2 हजार 300 मीटर होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर डीव्हीओआर दिशादर्शक प्रणालीही सुरू करण्याची भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून तयारी सुरू आहे.

Back to top button