कोल्हापूर : ‘कासारी’ धरणात ५१ टक्के पाणीसाठा; गतवर्षीपेक्षा ४ टक्के पाणीसाठा कमी  | पुढारी

कोल्हापूर : ‘कासारी’ धरणात ५१ टक्के पाणीसाठा; गतवर्षीपेक्षा ४ टक्के पाणीसाठा कमी 

विशाळगड, पुढारी वृत्तसेवा : शाहूवाडी तालुक्यातील काही गावांना व पन्हाळा तालुक्याला सुजलाम् सुफलाम् करणाऱ्या कासारी (गेळवडे) या मध्यम प्रकल्पात शुक्रवारी अखेर (दि.२४) ५१.१४ टक्के पाणीसाठा असून, तो गतवर्षीच्या तुलनेने चार टक्का कमी आहे. उर्वरित पाच लघुपाटबंधारे प्रकल्पात सरासरी ३५ ते ६३ टक्क्यांपर्यंत पाणीसाठा शिल्लक आहे. इतर सर्वंच लघू धरणांतील पाणीसाठा मुबलक असल्याने यंदा सिंचन व पिण्यासाठी जूनअखेर पाणी उपलब्ध होईल, असे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे.

 कासारी परिसरातील पाणी प्रश्न सोडवून परिसरातील जमीन ओलिताखाली येण्याच्या दृष्टीने कासारी नदीवर बाजीप्रभू जलाशयाच्या कामाला दिनांक २४ एप्रिल १९७७ मध्ये सुरुवात झाली. त्यासाठी ३३.२८ चौरस किलोमीटरच्या पाणलोट क्षेत्रामध्ये एकूण ७८.५६ दलघमी पाणी साठा व्हावा अशा पद्धतीने आखणी करण्यात आली. गेळवडे, गजापूर या गावांचे पुनर्वसन झाल्याने ३८०.३० मिटर लांबीचा हा प्रकल्प साकारण्यात आला. शाहूवाडीतील २० व पन्हाळ्यातील ४१ गावातील सुमारे ९ हजार ४५८ एकर सिंचन क्षेत्राला हा प्रकल्प जीवनदायी ठरला आहे.

कासारी पाणलोट क्षेत्रात कासारी (गेळवडे) या प्रमुख मध्यम प्रकल्पासह पडसाळी, पोंबरे, नांदारी, कुंभवडे व केसरकरवाडी हे लघू पाटबंधारे प्रकल्प येतात. गेळवडे हे प्रमुख धरण असून याची पाणी साठवण क्षमता २.७७ टीएमसी आहे. या प्रकल्पामधून शाहूवाडी तालुक्यातील २० गावांना व पन्हाळा तालुक्यातील बहुतांशी ४१ गावांना कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांमधून पाणी मिळते. उन्हाळ्यात पाणी अडविण्यासाठी नदीवर जागोजागी कोल्हापूर पद्धतीचे १४ बंधारे आहेत. गतवर्षी याच दिवशी गेळवडे धरणात ५५.४४ टक्के पाणीसाठा होता. तो आता ५१.१४ टक्के आहे.

इतर लघू धरणांतील पाणीसाठा असा (कंसात गतवर्षीची टक्केवारी)

पडसाळी ५१.९६ (५० टक्के), पोंबरे ५९.८४ (६८ टक्के), नांदारी ३५.२७ (३७.२१ टक्के), केसरकरवाडी ४१.२८ (४३.६६ टक्के), कुंभवडे ६३.८१ (६१.६७) असा २३ मार्चअखेर कासारी पाणलोट क्षेत्रातील विविध धरणांत पाणीसाठा शिल्लक आहे. जूनअखेर कासारी पाणलोट क्षेत्रातील गावांना शेतीसह पिण्याच्या पाण्याची कमतरता भासणार नाही; अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली.

हेही वाचलंत का?

Back to top button