तक्रारी आता ऑनलाईन; ३६ जिल्ह्यांत 'आपले सरकार' तक्रार निवारण प्रणाली | पुढारी

तक्रारी आता ऑनलाईन; ३६ जिल्ह्यांत 'आपले सरकार' तक्रार निवारण प्रणाली

कोल्हापूर; अनिल देशमुख :  नागरिकांना तक्रारी आता ऑनलाईन कराव्या लागणार आहेत. याकरिता मंत्रालयासह राज्यातील ३६ जिल्ह्यांत ‘आपले सरकार’ तक्रार निवारण प्रणाली विकसित करण्यात आली आहे. याद्वारे तक्रारी ऑनलाईन पद्धतीने स्वीकाराव्यात, असे आदेश राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिले आहेत.

नागरिकांकडून विविध शासकीय कार्यालयांना विविध प्रकारच्या तक्रारी दाखल होत असतात. काही तक्रारी लेखी स्वरूपात दिल्या जातात. काही तक्रारी टपालाद्वारे (पोस्ट) पाठविल्या जातात. काही तक्रारी या निनावी स्वरूपाच्या असतात, यामुळे त्याची दखल सहजा घेतली जात नाही. काही तक्रारीत तक्रारीचे स्वरूपच मोघम असते. यामुळे कार्यवाहीबाबतचा प्रश्न उपस्थित होतो. लेखी स्वरूपात दाखल झालेल्या तक्रारीचा प्रत्यक्ष दखल घेणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांपर्यंतच प्रवास वेळखाऊ असतो. तक्रार अर्जांवर पोहोच दिली जाते; मात्र अनेकदा नंतर त्या तक्रार अर्जाचा शोध  घेणे तक्रारदारांना अवघड होते. यासर्व पार्श्वभूमीवर तक्रारींचे जलदगतीने निर्गतीकरण व्हावे, याकरिता राज्य शासनाने आपले सरकार तक्रार निवारण प्रणाली विकसित केली आहे. त्याद्वारे आता नागरिकांकडून ऑनलाईन तक्रारीच स्वीकारल्या जाव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

लेखी तक्रारीही ऑनलाईनमध्ये रूपातंरीत करणार

ज्या कार्यालयाकडे लेखी अथवा टपालाद्वारे तक्रारी दाखल होतात, ज्या कार्यालयात अशा तक्रारी दाखल झाल्या आहेत, अशा कार्यालयांना अशा लेखी तक्रारीसंबंधित संगणकीय प्रणालीत ऑनलाईन पद्धतीत समाविष्ट करून पुढे पाठवण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. यामुळे लेखी अथवा टपालाने तक्रार दिली, तरी ती तक्रार पुढे ऑनलाईन स्वरूपातच कार्यान्वित होणार आहे.

ऑनलाईन तक्रार अर्जाने काय होणार?

तक्रारदार, संबंधित कार्यवाही करणाऱ्या यंत्रणेचा वेळ वाचणार आहे. तक्रार अर्ज गहाळ होणे, सद्यस्थितीत कोणत्या ” टेबलवर आहे हे न समजणे असे प्रकार होणार नाहीत. तक्रार अर्जाचे सर्व रेकॉर्ड ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होईल. भविष्यातही संदर्भ म्हणून वापर करता येईल.

मोबाईल क्रमांकावर येणार संदेश

समक्ष लेखी तक्रार दाखल करणाऱ्या तक्रारदाराचा मोबाईल क्रमांक तक्रारीवर लिहून घ्यावा, असेही आदेश देण्यात आले आहेत. तक्रारीवर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर तक्रार प्राप्त झाल्याचा संदेश दिला जाईल. त्याखेरीज त्या तक्रार अर्जाची सद्यस्थिती तक्रारदाराला समजणार आहे..

Back to top button