कोल्हापूर, गडहिंग्लज, जयसिंगपूर बाजार समित्यांसाठी 28 एप्रिलला मतदान | पुढारी

कोल्हापूर, गडहिंग्लज, जयसिंगपूर बाजार समित्यांसाठी 28 एप्रिलला मतदान

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर, गडहिंग्लज, जयसिंगपूर या तिन्ही शेती उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून, सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव डॉ. पी. एल. खंडागळे यांनी मंगळवारी समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. सोमवार (दि. 27) पासून उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्यात येणार आहेत; तर 28 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यामुळे जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे.

या तिन्ही बाजार समित्यांच्या संचालक मंडळांची मुदत ऑगस्ट 2020 मध्ये संपली. या बाजार समित्यांवर प्रशासक मंडळ आहे. सहकारी निवडणूक प्राधिकरणाने सप्टेंबर 2022 मध्ये बाजार समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यासाठी 29 जानेवारी 2023 रोजी मतदान होणार होते; पण त्याच दरम्यान सेवा संस्था व ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या. या संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बाजार समित्यांच्या मतदारयाद्या अद्ययावत करा आणि 30 एप्रिलपर्यंत समित्यांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सध्या हा कालावधी पूर्ण होण्यास 40 दिवस शिल्लक आहेत. यादरम्यान ही निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

या तिन्ही बाजार समित्यांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे; पण राज्यातील सत्ता बदलल्यानंतर बाजार समित्यांच्या निवडणुकीची समीकरणे बदलणार आहेत. दरम्यान, जिल्ह्यात साखर कारखान्यांच्या निवडणुकाही सुरू आहेत. याच दरम्यान बाजार समित्यांच्या निवडणुका होत असल्याने अनेक इच्छुकांचे या निवडणुकीकडे लक्ष लागून राहिले आहे.

Back to top button