कोल्हापूर : गांधी मैदानास ५ कोटींचा निधी; राजेश क्षीरसागर यांच्या पाठपुराव्यास यश | पुढारी

कोल्हापूर : गांधी मैदानास ५ कोटींचा निधी; राजेश क्षीरसागर यांच्या पाठपुराव्यास यश

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : ऐतिहासिक गांधी मैदान फक्त शिवाजी पेठेची अस्मिता नसून कोल्हापूरची अस्मिता आहे. कोल्हापुरातील अनेक नामवंत खेळाडू या मैदानात घडले आहे. परंतु गेले अनेक दिवसांपासून मैदानाची हेळसांड व दुरावस्था झाली आहे. यामुळे खेळाडुंची गैरसोय होत आहे. याकडे लक्ष देत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व मित्र संस्थेचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी वारंवार पाठपुरावा केला. त्यांच्या या पाठपुरव्यातून व विशेष प्रयत्नातून राज्य शासनाच्या नगर विकास विभागाकडून गांधी मैदानाच्या विकासासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. याबाबतची माहिती दिली. याबाबत मंगळवारी (दि.२१) नगर विकास विभागाकडून निधी मंजुरीचा शासन निर्णय पारित करण्यात आल्याची माहिती राजेश क्षीरसागर यांनी दिली.

कोल्हापूर शहरामध्ये मध्यवस्तीतील शिवाजी पेठ व मंगळवार पेठ या दोन्ही पेठांच्या मध्यवर्ती ठिकाणी महात्मा गांधी मैदान आहे. सदर मैदानाच्या परिसरामध्ये शहरातील नामांकित शाळा व महाविद्यालये असून, यातील हजारो विद्यार्थी दररोज या मैदानावर खेळण्यास येतात. सदर मैदानाचा परिसर दाट लोकवस्तीचा परिसर असून येथील अबाल- वृद्ध, युवक, मुले खेळ, व्यायाम आदीकरिता या मैदानाचा नित्यनियमित उपयोग करतात.

गेल्या काही वर्षात गांधी मैदानालगत सांडपाणी वाहणाऱ्या चॅनेल मधील पाणी मैदानात येते आहे. त्यामुळे या मैदानाचे वारंवार नुकसान होत आहे. सुमारे ६ ते ७ महिने या मैदानात पाणी साचून खेळाडूंची गैरसोय होत आहे. यासाठी महाराष्ट्र हायस्कूल ते सरदार चौक ते अपना बँक ते उभा मारुती ते साकोली कॉर्नर पर्यंत व गांधी मैदान लगतची स्ट्रॉम वॉटर ड्रेनेज व क्रॉसड्रेनचे काम तातडीने करणे आवश्यक आहे.

तसेच मैदान विकसित करून खेळाडू व नागरिकांना परिपूर्ण सुविधायुक्त मैदान उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर असताना दि.१३ ऑगस्ट २०२२ रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये महात्मा गांधी मैदान विकसित करणेबाबत मी निधी मागणी केली होती. यानंतर कोल्हापूर महानगरपालिका यांनी एकूण २३.४५ कोटींचा प्रस्ताव सादर केला होता.

तात्काळ यातील सांडपाणी निचरा होण्याचे काम जलद गतीने व्हावे व मैदानाची दुरावस्ता थांबवावी याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे महाराष्ट्र हायस्कूल ते सरदार चौक ते अपना बँक ते उभा मारुती ते साकोली कॉर्नर पर्यंत व गांधी मैदान लगतची स्ट्रॉम वॉटर ड्रेनेज व क्रॉसड्रेनचे काम तातडीने करणे या कामास तात्काळ निधी मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार याचा पहिला टप्पा म्हणून मंगळवारी नगर विकास विभागाने महाराष्ट्र हायस्कूल ते सरदार चौक ते अपना बँक ते उभा मारुती ते साकोली कॉर्नर पर्यंत व गांधी मैदान लगतची स्ट्रॉम वॉटर ड्रेनेज व क्रॉसड्रेनचे काम तातडीने करणे या कामास ५ कोटींचा निधी मंजूर केला असून, लवकरच निधी वर्ग होवून या कामास सुरवात होणार आहे.

यासह लवकरच गांधी मैदान विकसित करणे, स्प्रिंकलर सिस्टीम बसविणे, गॅलरी बांधणे, इनडोअर खेळांसाठी हॉल बांधणे व साहित्य पुरवणे, इलेक्ट्रीकल व्यवस्था करणे या उर्वरित कामासाठी निधी मंजुरीसाठी पाठपुरावा करणार असल्याचेही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व मित्र संस्थेचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगितले आहे.

एकूणच मंजूर झालेल्या निधीबद्दल शहरवासीय आणि खेळांडूमधून समाधान व्यक्त होत असून, आगामी काळात गांधी मैदानाचा कायापालट होवून हे मैदान खेळांडूसाठी पुन्हा हक्काचे मैदान ठरणार असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

अधिक वाचा :

Back to top button